वाराणासी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणासीत पोहोचले आहेत. काशी येथे आल्यानंतर त्यांनी कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिरात मोदी जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विश्वानाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. वाराणासी एअरपोर्टवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं.
विमानतळावरून मोदी थेट कालभैरव मंदिरात पोहोचले. काशीच्या कोतवाल कालभैरव मंदिरात येऊन त्यांनी पूजा अर्चना केली. या मंदिरात मोदी तब्बल 20 मिनिटे होते. यावेळी त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याशीही चर्चा केली.
काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या कार्यक्रमाचं लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी 55 हाय-डेफिनेशन कॅमेरे, चार जिमी जिब आणि मोठा ड्रोन तैनात करण्यात आला आहे. दिव्य काशी, भव्य काशी कार्यक्रमाचं प्रसारण करण्यासाठी 55 कॅमेरामनसहीत 100 लोकांचं एक पथक घटनास्थळी आहे.
आजदुपारी एक वाजता मोदी 339 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या काशी विश्वानाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत. यावेळी 151 डमरू वादक डमरू वाजवून मोदींचं भव्य स्वागत करणार आहेत. त्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी हे बरेका गेस्ट हाऊसला पोहोचतील. सायंकाळी ते रो रो बोटीनं गंगा आरतीत सहभागी होतील. ही वेळ असेल 5.30 ची. यावेळी मोदींसोबत इतर नेते मंडळीही आरतीत असतील. नंतर ते परत मुक्कामाला बरेका गेस्ट हाऊसवर येतील.
देशविदेशातील भाविकांची सोय व्हावी आणि पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र बनावं म्हणून काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्या म्हणजेच 14 डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता काशी वाराणसी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मोदी बैठक करतील. ही बैठक अर्धा तास चालेल. सकाळी दहा वाजता भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु होईल. भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं हे संमेलन चार तास चालण्याची शक्यता आहे. यात गुजरात, गोवा, हरयाणा, कर्नाटक, आसाम, अरुणाचलप्रदेश, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे मुख्यमंत्री स्वत:च्या राज्यातल्या विकास कामांवर प्रजेंटेशन देतील.
संबंधित बातम्या:
Narendra Modi in Varanasi LIVE : कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती