खिलाडी अक्षय कुमार ते ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद…, 2024 साठी कोणी कोणी दिल्या फिटनेस टिप्स, घ्या जाणून
मन की बातच्या 108 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेसवर सर्वाधिक चर्चा केली. तंदुरुस्त राहिल्यावरच यशाचा आनंद लुटता येतो, असे त्यांनी देशातील तरुणांना सांगितले.
नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : मन की बातच्या 108 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रहो फिट, रहो हिट’चा नारा दिला. ज्या वेगाने देशाचा विकास होत आहे त्याचा सर्वाधिक फायदा भारतीय तरुणांना होणार आहे. प्रत्येक तरुण जेव्हा तंदुरुस्त राहील तेव्हाच त्याला आनंद घेता येईल असे ते म्हणाले. पीएम मोदी यांनी शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक फिटनेसवरही चर्चा केली. यादरम्यान त्यांनी अनेक सेलिब्रिटींना फिटनेस टिप्स देण्यासाठी आमंत्रित केले होते. कोणत्या सेलिब्रिटींना काय फिटनेस टिप्स दिल्या ते जाणून घेऊ.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांची फिटनेस टिप्स
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तंदुरुस्ती असे सांगितले. यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम, योगासने आणि भरपूर झोप आवश्यक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी युवकांनी व्यायाम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हरमनप्रीत कौरच्या फिटनेस टिप्स
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, आपण काय खातो आणि कधी खातो हे सर्वात महत्त्वाचे आहे. पीएम मोदी यांनी बाजरीबद्दल सांगितले. बाजरी सहज पचण्याजोगे आणि अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय ७ तास पुरेशी झोप घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या.
स्ट्रॉंग स्टार्टअपच्या ऋषभ मल्होत्राच्या टिप्स
बंगळुरू येथील ऋषभ मल्होत्रा यांनी असे सांगितले की, भारताच्या पारंपारिक व्यायामाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट आहे. गदा आणि मुद्गल याचा व्यायाम हजारो वर्षे जुना आहे. ते आम्ही आधुनिक स्वरूपात परत आणले आहे. भारतात अनेक प्राचीन व्यायाम आहेत. ज्यांचा अवलंब केला पाहिजे. गदा व्यायामाने सर्व काही करता येते अशा महत्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या.
ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद म्हणतो…
बुद्धिबळाचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांनी मी मानसिक तंदुरुस्तीसाठी योगा करतो. आठवड्यातून दोन दिवस कार्डिओ करतो. लवचिकता वाढवण्यासाठी व्यायाम, वजन प्रशिक्षण आणि तग धरण्याची क्षमता आवश्यक आहे. मानसिक तंदुरुस्ती आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण महत्त्वाचे आहे. आपण शांत आणि एकाग्र राहण्याची सवय लावली पाहिजे. तसेच, प्रत्येकाने किमान 7-8 तासांची चांगली झोप घेतली पाहिजे अशा टिप्स दिल्या.
खिलाडी स्टार अक्षय कुमारच्या फिटनेस टिप्स
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या टिप्स देताना सांगितले, नैसर्गिक फिटनेस हा अधिक महत्त्वाचा आहे. सकस आहार घ्यावा. काय चांगले आणि काय वाईट याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. मूव्ही स्टार बॉडीचे अनुसरण करू नका. कोणी चुकीचे शॉर्टकट अवलंबताना पाहून अशा शॉर्टकटमुळे शरीर तरारते पण आतून ते पोकळ होते. फिटनेस ही एक तपश्चर्या आहे. ती कॉफी किंवा नूडल्स नाही जी दोन मिनिटांत पूर्ण होईल. नवीन वर्षासाठी असा संकल्प करा की कोणतेही रसायन नाही. शॉर्टकट नाही. ध्यान करा आणि तंदुरुस्त जीवन जगा असे खिलाडी अक्षय कुमार म्हणाला.