Oommen Chandy Death : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Oommen Chandy Passes Away : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन झालंय. 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाच मतदारसंघातून ते 12 वेळा आमदार राहिले. पाहा कसा होता केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचा राजकीय प्रवास?
Kerala Former CM Oommen Chandy Passes Away | 18 जुलै 2023 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन झालंय. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केरळच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालंय. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकरन आणि ओमान चांडी यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केरळ राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओमान चांडी यांचं निधन झालं. बंगळुरुतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
ओमान चांडी यांच्या मुलाने याबाबतची माहिती दिली आहे. अप्पा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाने आपल्या सगळ्यांवरच दु:खा चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या रुपाने ते कायम आपल्यात असतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोण होते ओमान चांडी?
ओमान चांडी हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते होते. दोन वेळा केरळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1970 साली वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी पुथुपल्ली या मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांना विजय मिळाला. त्यानंतर याच मतदारसंघातून ते 12 वेळा आमदार झाले. पाच दशकं हा मतदारसंघ ओमान चांडी यांच्याकडे राहिला.
ओमान चांडी यांनी केरळच्या राजकारणात काँग्रेसला अढळ स्थान मिळवून दिलं. शिवाय पक्षाचा विस्तार आणि केरळच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं.
काही दिवसांआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेतही ओमान चांडी सहभागी झाले होते.
2004 ते 2006 आणि 2011 ते 2016 या काळात ओमान चांडी दोनदा केरळचे मुख्यमंत्री राहिले. शिवाय ते विरोधी पक्षनेते पदही होतं. 2006 ते 2011 या काळात केरळ विधानसभेत ते विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी सांभाळत होते.
ओमान चांडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. दोन प्रकरणात त्यांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप त्यांचावर ठेवण्यात आला. केरळचे अर्थमंत्री असताना पामोलेन घोटाळ्यात त्यांचं नाव घेण्यात आलं. 1991 ला या घोटाळ्याने केरळच्या राजकीय वर्तुळात भुकंप आला होता. याशिवाय सोलर घोटाळ्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले होते.