Kolkata Rape Case : “आमच्याकडे या, पण असे अत्याचार करु नका”, देहविक्री करणाऱ्या महिलांचा फुटला अश्रुचा बांध, समाजाला दाखवला आरसा
Prostitutes Appeal to Society : कोलकत्ता येथील वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरवरील अत्याचाराने देशभरात संतापाची लाट उसळली. प्रशासकीय आणि पोलीस दिरंगाईने संतापाचा कडेलोट झाला. याप्रकरणात देहविक्री करणाऱ्या महिलांना पण अश्रु थांबवता आले नाही. त्यांच्या आवाहनाने समाज मन सुद्धा हेलावले.
कोलकत्ता येथे महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभरात आगडोंब उसळला आहे. निर्भया कांडनंतर देश पुन्हा हादरला. भारतातील अनेक शहरात या घटनेने जनता रस्त्यावर उतरली. सरकारी दिरंगाईने संतापाचा कडेलोट झाला. याप्रकरणात आशियातील सर्वात मोठे वेश्यालय असलेल्या सोनागाछी येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना सुद्धा अश्रु अनावर झाले. त्यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांच्या आवाहनाने समाज मन सुद्धा हेलावले. काय आहे हे प्रकरण?
समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन
कोलकत्ता येथील बलात्कार आणि खून प्रकरणाने समाजमन हेलावले आहे. नराधमांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी करण्यात येत आहे. तर याप्रकरणात प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्यांना पण शिक्षा देण्याची मागणी होत आहे. समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आशियातील सर्वात मोठे वेश्यालय असलेल्या सोनागछी येथील देहविक्री करणाऱ्या महिलांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना पुन्हा होऊ नये. एका महिला डॉक्टरसोबत इतक्या क्रुरपणे घडलेली घटना मन अस्वस्थ करणारी आहे. आम्ही या घटनेने हादरुन गेलो आहोत. ही पशूवृत्ती आहे. आम्ही सर्व शरीर विक्री करणाऱ्या महिला आहोत. हे आमचे काम आहे. आमच्याकडे या पण अशा घटना करु नका, कोणाचे आयुष्य, जीवन बर्बाद करु नका असे आवाहन या महिलांनी केले आहे. समाजाच्या मानसिकतेवर या महिलांनी कठोर प्रहार केला आहे.
आता कोलकत्ता सुरक्षित आहे असे वाटत नाही
किती ही पशूवृत्ती, त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केली. या घटनेने आम्ही पण हादरलो आहोत. समाजात इतक्या नीच वृत्तीचे श्वान, हिंस्त्र लोक आपल्या आजुबाजूला असतात. आपल्या देशातील मुलींना आजही दबावात ठेवले जाते. त्यामुळे आजही आपण 21 व्या शतकात असतानाही मागे जात आहोत. आतापर्यंत कोलकत्ता शहर हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानण्यात येत होते. पण या घटनेमुळे महिला आणि मुलींसाठी हे शहर सुरक्षित असल्याचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया या देहविक्री करणाऱ्या महिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
काय आहे प्रकरण?
कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती. बलात्कार आणि खुनाची घटना 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घडली. आरोपींनी या डॉक्टरसोबत निर्दयतेने अत्याचार केला. तिला यातना देत संपवले. तिच्या शरीरावर इतके घाव करण्यात आले की त्याची मोजदाद कमी पडेल. या पशूंनी तिच्यावर अत्याचार केला. खून केला आणि ते शांतपणे त्यांच्या बरॅकीत येऊन झोपले. कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाने 13 ऑगस्ट रोजी सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.