कोकणचे प्रवासी उपाशी, दक्षिणेचे प्रवासी तुपाशी ! कोकण रेल्वेसाठी सर्वस्व देणाऱ्यांच्या हालअपेष्टा केव्हा संपणार ?

कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वेला कोकणातील जनतेने आपल्या जमीनी दिल्या. मुंबई आणि मंगळुरु बंदरांना जोडणारा महत्वाचा मार्ग रेल्वेला मिळाला. परंतू 30 वर्षे झाले तरी या रेल्वे मार्गाचा विस्तार झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यांनाच कोकण रेल्वेचा खरा फायदा झाला. स्वतंत्र महामंडळ असून कोरेने रो-रो सेवा आणि लॉजिस्टीक पार्कसारख्या सुविधा उभारल्या. परंतू स्वतंत्र महामंडळ असल्यानेच कोकण रेल्वेचा विकास खुंटलाय का ?

कोकणचे प्रवासी उपाशी, दक्षिणेचे प्रवासी तुपाशी ! कोकण रेल्वेसाठी सर्वस्व देणाऱ्यांच्या हालअपेष्टा केव्हा संपणार ?
Konkan Railway Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 2:41 PM

मुंबई : कोकणातील चाकरमानी दरवर्षी न चुकता गणपती, होळी अशा सणांना हटकून गावी जातोच जातो. पूर्वी गावी जाण्यासाठी लाल परी एसटी हेच एक माध्यम होते. परंतू , कोकण रेल्वे सुरु झाली आणि चाकरमान्यांचा लांबपल्ल्याचा प्रवास वाचला, पैसे वाचले आणि वेळही वाचला. कोकणासाठी कोकण रेल्वे फायद्याची ठरेल असे वाटत होते. पण, चाकरमान्यांचे होणारे हाल काही चुकले नाहीत. आताही कोकणाचा मोठा उत्सव म्हणजे गणपती हा सण अवघ्या तीन – चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांनी गणपतीमध्ये गावी जाण्यासाठी  400 च्यावर वेटिंगची रेल्वे तिकीटे देऊ नयेत अशी महत्वाची मागणी केली आहे. कोकण रेल्वेला सर्वाधिक जमीन महाराष्ट्राने दिली. परंतू, कोकण रेल्वेचा फायदा महाराष्ट्राला कमी तर दक्षिणेकडील राज्यांनाच अधिक होत आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानकांवर सोयी सुविधा नाहीत, मार्गांचे दुपदरीकरण रखडले आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून महाराष्ट्रावर जो अन्याय सुरु आहे तो आजही तसाच कायम आहे. कोकणातील डोंगर, दऱ्या, नदी अशी विविध कारणे देत कोकण रेल्वे 30 वर्ष झाली तरी आजही आचके देत आहे. कोकण रेल्वेचा विस्तार होणार तरी कधी ? कोकण रेल्वेचा प्रवास रुळावर येणार तरी कधी असे नानाविध प्रश्न आवासून समोर उभे आहेत. याच प्रश्नांचा घेतलेला हा मागोवा…

कोकण रेल्वेची मुहुर्तमेढ कशी झाली ?

परशूरामाने निर्माण केलेली भूमी म्हणून कोकणाला ओळखले जाते. भारतात ब्रिटीशांना रेल्वे उभारण्याचे श्रेय दिले जाते. परंतू कोकण किनाऱ्यावर रेल्वे बांधणे ब्रिटीशांनाही जमले नाही. ते काम भारतीय इंजिनियर्सनी पुढे केले. या भागात रेल्वे असावी असा प्रस्ताव सुमारे शंभर वर्षांपूर्वी 1920 साली सर्वप्रथम पुढे आला. त्यासाठी सर्वेक्षण देखील झाले, त्यानंतर 37 वर्षांनंतर रायगड आणि मंगलोर भागात सर्वेक्षण झाले. कोकण रेल्वे उभारण्याचे सर्वात मोठे श्रेय समाजवादी नेते मधू दंडवते यांना जाते. 1977 साली जनता पक्षाच्या सरकारमध्ये मधू दंडवते रेल्वेमंत्री पदी असताना त्यांनी पहिल्यांदा कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला. रेल्वेमॅन ई. श्रीधरन यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरु झाले. त्यावेळी 1989 से 1990 पर्यंत रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नाडिस यांनी कोकण रेल्वेच्या प्रकल्पाला चालना दिली.

कोकण रेल्वे उभारताना आलेल्या अडचणी

जमीन अधिग्रहणाचा सर्वात मोठा अडथळा होता. या रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यासाठी कोणी तयार नव्हते. अखेर गावकऱ्यांना कोकण रेल्वेचे महत्व समजविले त्यानंतर अखेर गावकऱ्यांनी आपल्या पिढ्यान पिढ्या कसलेल्या जमीनी रेल्वेला दिल्या. जमीन संपादनासाठी एक वर्षांहून अधिक काळ लागला. या लाल माती काम करणे अवघड होते. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळणे यामुळे निसर्गाला आव्हान देत रेल्वेने हे बांधकाम सुरु झाले. सुरुवातीची चार वर्षे रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी जमीन योग्य बनविण्यातच गेली. कारण पावसाने सर्व वाहून जायचे. चार वर्षांत 19 कामगारांचा मृत्यू झाला. तर एकूण 74 जणांचा मृत्यू झाला. हा भाग दाट जंगलाचा असल्याने जनावरांच्या हल्ल्यातही अनेक जणांचे मृत्यू झाले.

कोकण रेल्वे कधीपासून सुरु झाली

आप्टा ते मंगलोरपर्यंत 771.25 किमीचा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला. साल 1970 ते 1972 दरम्यान आप्टा ते मंगलोरपर्यंत सर्वेक्षण झाले. आप्टा – रोहा ते दसगावपर्यंत 1974 ते 1975 अखेरचे सर्वेक्षण झाले. 1988 मध्ये केंद्र सरकारला कोकण रेल्वेचा प्रकल्प अहवाल सादर झाला. अखेर 1990 साली कोकण रेल्वेच्या बांधकामाला सुरुवात झाली. कोकण रेल्वेचा आप्टा ते रोहा दरम्यान 60 किमीचा पहिला टप्पा बांधण्यात आला. कर्नाटकातील मंगलोर ते उडुपी दरम्यान 20 मार्च 1993 रोजी पहिली पॅसेंजर ट्रेन धावली. जून महिन्यात रोहा ते वीर दरम्यान दुसरी पॅसेंजर ट्रेन धावली. 26 जानेवारी 1998 रोजी महाराष्ट्राच्या रोहा ते कर्नाटकाच्या ठोकूर या स्थानकांदरम्यान अखेर कोकण रेल्वे धावली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिरवा झेंडा दाखवून कोकण रेल्वेचे उद्घाटन केले. रोहा ते ठोकूर 738 किमीच्या मार्गावर कोकणे रेल्वे धावते. कोकण रेल्वेवर एकूण 72 स्थानके आहेत. या मार्गावर 160 ताशी किमी वेगाने ट्रेन धावते.

कोकण रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा

या मार्गावर 91 बोगदे खणण्यात आले आहेत. या बोगद्यांपैकी रत्नागिरीतील करबुडे हा बोगदा साडे सहा किमी लांबीचा असून कोकण रेल्वेवरील हा सर्वात मोठा बोगदा आहे. 179 मोठे तर 879 लहान पुल बांधण्यात आले. यापैकी शरावती नदीवर 2.065 किमीचा सर्वात लांबीचा पुल बांधला आहे. पनवल नदीवर 64 मीटरचा सर्वात उंच पुल बांधण्यात आला आहे. कोकण रेल्वेमुळे किनारपट्टीच्या उद्योगांना चालना मिळाली. सध्या कोकण रेल्वेचा वार्षिक महसुल तीन हजार कोटींच्या घरात आहे. 738 किमीच्या मार्गापैकी महाराष्ट्रात कोकण रेल्वेचा 361 किमी मार्ग येतो. तर कर्नाटकात 239 किमी तर गोव्यात 156 किमी इतका भाग आहे.

रोहा ते वीर दुपदरीकरण

कोकणाच्या मार्ग रोहा ते ठोकूर असा 738 किलोमीटरचा आहे. परंतू दुपदरीकरणाचे काम केवळ रोहा ते वीर दरम्यान झालेले आहे. मध्य रेल्वेच्या रोहा ते रत्नागिरीतील वीर स्थानकांदरम्यान एकूण 46.8 किमी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम ऑक्टोबर 2016 मध्ये सुरु करण्यात आले होते. हे दुपदरीकरणाचे काम 30 ऑगस्ट 2021 रोजी संपले. याचा उपयोग क्षमता वाढीसाठी झाला. मात्र त्यानंतर हा मार्ग पुन्हा एकेरी असल्याने एका मर्यादेबाहेर जादा गाड्या चालविणे शक्य होत नसल्याचे म्हटले जात आहे.

10 नवीन क्रॉसिंग स्थानके मिळाली

कोकण रेल्वेने 248 कोटी खर्च करुन 10 नवीन क्रॉसिंग स्टेशन आणि 8 अतिरिक्त लूप लाईन बांधल्या आहेत. साल 2017 मध्ये हे काम सुरु झाले आणि टप्प्या टप्प्याने पूर्ण झाले. सापे – वामणे, कळंबनी, कडवई, वेरवली, खारेपाटण, गोरेगाव तोडा, इंदापूर, आचिर्णे, मिर्झान आणि इन्नाजे ही दहा स्थानके तयार झाली तर माणगाव, विन्हेरे, अंजनी, सावर्डे, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी आणि मुरुडेश्वर येथे अतिरिक्त लूपलाईन तयार करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे वीजेवर धावू लागली

कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे कामाची सुरुवात नोव्हेंबर 2015 रोजी सुरु झाली होती. रोहा ते ठोकूर या 741 किमी मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्च 2022 रोजी पूर्ण झाले. पाच टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. ठोकूर-बिजूर, बिजूर-कारवार-कारवार-थिवीम, थिवीम-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा. यातील शेवटचा टप्पा रत्नागिरी-थिवीमचे विद्युतीकरण 28 मार्च 2022 रोजी पूर्ण झाले. या कामासाठी 1,287 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे वार्षिक 150 कोटी रुपयांची इंधन बचत होत आहे.

चार राज्यांचा प्रकल्प

कोकण रेल्वे बांधण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले. कोकण रेल्वे बीओटी तत्वांवर बांधण्यात आली होती. परंतू 1998 साली कोकण रेल्वेचे बांधकाम पूर्ण झाले. कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातून धावणार होती. म्हणून केंद्राने ( भारतीय रेल्वे ) 51 टक्के भागीदारी उचलली. तर कर्नाटकने 15 टक्के, केरळ तसेच गोवा राज्याने प्रत्येकी सहा टक्के भागीदारी उचलली तर महाराष्ट्राने सर्वाधिक 22 भागीदारी उचलली. 1988 मध्ये केंद्र सरकारला कोकण रेल्वेचा प्रकल्प अहवाल सादर केला गेला. अखेर 1990 साली कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली.

दुपदरीकरणासाठी 25000 कोटींची गरज

कोकण रेल्वेचा मार्ग एक चमत्कारच मानला जातो. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि निसर्गाची आव्हाने पेलत हा मार्ग बांधण्यात आला आहे. या भागातील लाल माती आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी यामुळे या भागात उभा कातळ कापून बोगदे तयार करीत मार्ग बांधणे मुळातच अवघड होते. हा रेल्वे मार्ग बांधताना खणलेले बोगदे हे एकेरी मार्गासाठीच होते. त्यामुळे या मार्गांवर दुपदरी मार्ग बांधण्यासाठी पुन्हा नवीन मार्ग बांधण्याइतकाच खर्च आणि वेळ लागणार आहे. पुन्हा जमीन संपादन करावी लागणार आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी तब्बल 25000 कोटींची गरज आहे.

कोकणात दुपदरी मार्ग बांधणे का अवघड ?

कोकण रेल्वेचा हा मार्ग बांधताना अनेक उंच पुल बांधण्यात आले होते. आता दुपदरीकरणासाठी सध्याच्या ब्रिजच्या शेजारी दुसऱ्या मार्गिकेकरीता नवा ब्रिज बांधण्यासाठी पुन्हा खोदकाम करणे शक्य नाही. कारण जु्न्या पुलांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथे नवा मार्ग बांधण्यासाठी ( डायव्हर्जन ) वळण घालून दुसरा मार्ग बांधावा लागणार आहे. त्यासाठी जमीन लागणार आहे. वनविभाग तसेच गावकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. त्यामुळे जेथे जागा आहे तेथे सध्या दुपदरीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने सुरु करावे लागणार आहे. तसेच कोकण रेल्वे बांधण्यासाठी वेगळी कंपनी ( महामंडळ ) स्थापन केली आहे. कोणताही प्रकल्प मंजूर करताना कोकण महामंडळाच्या संचालक मंडळाला प्रत्येक प्रोजेक्टसाठी स्टेक होल्डर राज्यांची मंजूरी घ्यावी लागते. त्यामुळे दुपदरीकरणाचे काम प्रचंड खर्चिक आणि वेळखाऊ ठरणार आहे.

सर्व राज्यांना हा मार्ग हवासा

कोकण रेल्वेचा मार्ग झाल्याने उत्तरेकडील गाड्यांना दक्षिणेकडे जाण्यासाठी कोकण रेल्वेचा मार्ग सोयीचा आणि पैसे वाचविणारा झाला आहे. कर्नाटक, केरळ दिशेने जाणाऱ्या दक्षिणेच्या गाड्या येथून धावू लागल्या आहेत. देशातील सर्व रेल्वे झोनना कोकण रेल्वे मार्गावर गाड्या चालविण्याची इच्छा आहे. तेजस, हमसफर, राजधानी आणि नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ही या मार्गावरून धावते. आणखी गाड्या सुरु व्हाव्यात अशी सर्वच राज्यांची मागणी आहे. परंतु त्यासाठी वीर – मंगळुरु मार्गाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दुपदरीकरण करणे तसेच स्वतंत्र मालवाहतूकीचा मार्ग ( Dedicated Freight Corridor – DFC ) यासाठी आर्थिक तरतूद करण्याची कोणाचीही तयारी नसल्याचे म्हटले जात आहे.

मुलभूत सुविधांची वाणवा

कोकण रेल्वे मार्गावर इंदापूर, गोरेगाव रोड, सापे – वामणे, दिवान खवटी, कळंबणी बुद्रुक, आंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, सौन्दळ, खारेपाटण रोड येथे पुरेशा उंचीचे फलाट नाहीत. वैभववाडी सारख्या स्थानकांत पादचारी पूल नाहीत. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार फलाट आणि पादचारी पूल या किमान मूलभूत आवश्यक सुविधा आहेत. या मुलभूत सुविधा नसल्यामुळे कोकणातील अनेक स्थानकांत चढ-उतार करताना  काही वेळा अपघात होऊन इजा देखील होत असते.

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांना थांबा नाही

कोकण रेल्वेसाठी कोकणातील नागरिकांनी जमीन पण दिली आणि रोखेही खरेदी केले. परंतू कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात केवळ एक दिवा – सावंतवाडी गाडी सोडली तरी एकही गाडी सर्व स्थानकांवर थांबत नाही. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांच्या समस्या मोठ्या आहेत. मे महिन्यात सोडलेल्या उन्हाळी हंगामाच्या गाड्याही अपुऱ्या आहेत. त्यातच एसटी मंडळाने भरती न केल्याने तसेच अनेक एसटी चालकांच्या बदल्या झाल्या परंतू त्याबदल्यात चालक मिळालेले नाहीत. त्यामुळे जेथे मालवणला 800 रुपयांत जाता येते, तेथे 2000 रुपये भरून खाजगी गाड्यांद्वारे प्रवास करायला मजबूर व्हावे लागते असे गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी म्हटले आहे.

कोकण रेल्वेच्या स्वत:च्या केवळ चार-पाच गाड्या

कोकण रेल्वेच्या डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी मडगाव येथे एकच कोचिंग डेपो आहे. त्याची आणखी गाड्या हाताळण्याची क्षमता नाही. कोकण मार्गावरून धावणाऱ्या 40 ते 50 गाड्यांपैकी केवळ 5 ते 6 गाड्या कोकण रेल्वेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. त्याही पूर्वी दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या हुबळी डिव्हीजनच्या होत्या. कोरेच्या संपूर्ण मार्गावर कुठेही इंजिन पार्क करण्यासाठी लोको शेड नाही. त्यामुळे कोकण रेल्वेकडे प्रवासी आणि मालगाड्यांसाठी लागणारे स्वतःचे एकही इंजिन नाही. त्यासाठीही मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेवर अवलंबून रहावे लागते.

रत्नागिरीची पिट लाईन बंद

पूर्वी रत्नागिरी- दादर पॅसेंजरची देखभाल रत्नागिरीतच होत असे. परंतु 2015 पासून रत्नागिरी येथील पिट लाईन बंद आहे आणि तेथे कोणत्याही रेल्वे गाडीची देखभाल दुरुस्ती होत नाही. ती पूर्ववत करण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आताची रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर केवळ देखभाल दुरुस्तीसाठी 225 किलोमीटर लांब मडगावला न्यावी लागत आहे.

विलीनीकरण हाच पर्याय

कोकण रेल्वे मार्गावर गेल्या तीस वर्षांपासून प्रवासी वाहतूकीसाठी 40% तर मालवाहतुकीसाठी 50% अधिभार आहे. त्यातूनच रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीची आणि पावसाळ्यातील संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे केली जातात. हा अधिभार जर काढला प्रवाशांना फायदा होईल, परंतु त्यामुळे कोकण महामंडळाची आर्थिक डोलारा कोसळले. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे हाच पर्याय असल्याचे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.

400 च्यावर प्रतिक्षा यादी नको

गणपती सणासाठी 120 दिवस आधी तिकीट बुक करावे लागते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 सप्टेंबरच्या कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांची 120 दिवस आधीची आगाऊ आरक्षण सुरू होईल. या आरक्षणात जेमतेम 10 टक्के प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते. बाकीच्या प्रवाशांना काही सेकंदात 1000 ते 1200 पर्यंतची वेटींगची तिकिटे हातात पडतात. त्यातून कोकण रेल्वे 120 दिवस चांगलाच महसूल जमा करते. नुकसान मात्र प्रवाशांचे होते. याचा कोकण रेल्वे व्यवस्थापणाने विचार करायला हवा. यावर्षी पासून तरी इतर वेळी दिली जातात तशी जास्तीत जास्त 400 च्यावर वेटींगची तिकिटे वितरित करू नयेत. असे जर झाले तर प्रवासी 120 दिवस वेटींगवर राहणार नाहीत असे डोंबिवलीचे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.

चला गणपतिक गावाक जावची तिकीट बुक करुक व्हयी !

गेल्यावर्षी 19 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन झाले होते. यंदा 12 दिवस अगोदर म्हणजे 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे त्यांचे बुकींग 120 दिवस आधी करावे लागते, त्यामुळे ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. त्यामुळे नियमित गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. गणपती सणाच्या काही दिवस आधी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असते. संबंधित तारखांच्या आरक्षणाचा तक्ता वाचकांच्या माहीतीसाठी येथे देत आहोत.

आरक्षण दिनांक प्रवास सुरू दिनांक उत्सव
शनिवार, दि.04 मे 2024रविवार, दि. 01 सप्टेंबर 2024 -
रविवार, दि.05 मे 2024 सोमवार, दि. 02 सप्टेंबर 2024 -
सोमवार, दि. 06 मे 2024 मंगळवार, दि. 03 सप्टेंबर 2024-
मंगळवार, दि. 07 मे 2024 बुधवार, दि. 04 सप्टेंबर 2024-
बुधवार, दि. 08 मे 2024 गुरूवार, दि. 05 सप्टेंबर 2024-
गुरूवार, दि. 09 मे 2024शुक्रवार, दि. 06 सप्टेंबर 2024हरतालिका
शुक्रवार, दि. 10 मे 2024शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024श्री गणेश चतुर्थी
शनिवार, दि. 11 मे 2024रविवार, दि. 08 सप्टेंबर 2024ऋषी पंचमी
रविवार, दि.12 मे 2024सोमवार, दि. 09 सप्टेंबर 2024 -
सोमवार, दि.13 मे 2024 मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 गौरी आगमन
मंगळवार, दि.14 मे 2024 बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024गौरी पूजन
बुधवार, दि.15 मे 2024 गुरूवार, दि.12 सप्टेंबर 2024गौरी विसर्जन
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.