BJP | भाजपला मोठा झटका, ‘या’ दिग्गजाचा आमदारकीचा राजीनामा
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीला मोठा झटका लागला आहे. दिग्गज नेत्याने तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
बंगळुरु | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदाराने शुक्रवारी (31 मार्च) तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आता हा दिग्गज कोणत्या पक्षात जाणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा नेता काँग्रेस पक्षाचा ‘हात’ धरणार असल्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान अचानक या दिग्गज नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
कुदलिगी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार एन वाय गोपाळकृष्ण यांनी आमदारकीवर पाणी सोडलंय. तसेच गोपाळकृष्ण यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याचं म्हटलं जात आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द
गोपाळकृष्ण विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आपला राजीनामा दिला. गोपळकृष्ण विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गेले. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर राजीनामा दिला. रिपोर्टनुसार, गोपाळकृष्ण यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि सिद्धरामैया यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
भाजप आमदाराचा राजीनामा
Karnataka | BJP MLA from Kudligi constituency, NY Gopalakrishna resigns as MLA pic.twitter.com/Y1gjWv8TYp
— ANI (@ANI) March 31, 2023
काँग्रेसकडून 4 वेळा आमदार
गोपाळकृष्ण हे भाजपमध्ये येण्याआधी काँग्रेसच्या तिकीटावर 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. गोपाळकृष्ण हे चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलाकलमुरु विधानसभा मतदारसंघातूनच 4 वेळा विधानसभेवर गेले होते. मात्र 2018 मध्ये काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नाही.
त्यामुळे गोपाळकृष्ण यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून हातात भाजपचं कमळ घेतलं. त्यानंतर भाजपने त्यांना मोलाकालमुरुऐवजी विजयनगर जिल्ह्यातील कुदलिगी इथून उमेदवारी दिली. कारण ज्येष्ठ नेते श्रीरामुलु हे मोलाकालमुरु इथून निवडणुकीच्या रिंगणात होते. अखेर गोपाळकृष्ण हे विजयी झाले होते.
तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या 2 विधानपरिषद आमदारांनीही मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला.पुत्तन्ना आणि बाबूराव चिचंनसुर या दोघांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी भाजपची साथ सोडली.
दरम्यान 29 मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान पार पडेल. तर 2 दिवसांनंतर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्नाटकात कुणाचे किती आमदार
एकूण जागा -224 मॅजिक फिगर – 113 भाजप – 117 काँग्रेस – 69 जेडीसएस -32 इतर – 6