लाल डायरीमुळे ते विधानसभेत गाजले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या प्रचारासाठी निघाले
राजस्थानच्या 200 विधानसभेच्या जागांपैकी शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजेंद्र गुढा यांनी काँग्रेसला हात दाखवून शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका लागल्या. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याचा समावेश आहे. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान सभा, मोर्चे आणि आश्वासनांची बरीच उधळण झाली. पाच राज्यापैकी मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात मतदान झाले आहे, तर, राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यातील मतदान प्रक्रिया अद्याप बाकी आहे. यातील राजस्थानमधील निवडणुक प्रचारामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन्ट्री घेतलीय.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर 2023 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या 230 सदस्यांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान पार पडले. छत्तीसगडच्या 90 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर अशा दोन टप्यात मतदान झाले. मिझोराममधील 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान संपन्न झाल्रे. तर, तेलंगणाच्या 119 विधानसभा जागांसाठी 30 नोव्हेंबर आणि राजस्थानच्या 200 विधानसभा जागांसाठी 25 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.
राजस्थानच्या 200 विधानसभेच्या जागांपैकी शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजेंद्र गुढा यांनी काँग्रेसला हात दाखवून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आणि राजस्थानचा वारसा एकत्र आला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर राजेंद्र गुढा हे ‘लाल डायरी’ घेऊन विधानसभेत पोहोचले होते. या डायरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील आरोपांची संपूर्ण यादी असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे गुढा प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच माजी मंत्री राजेंद्र गुढा यांच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये जाणार आहेत. २३ नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार आहेत. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. तर, मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदानासाठी राजस्थानला जाणार आहेत.
मुंबईत राहणाऱ्या याच राजस्थानी मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात घडलेल्या राजकिय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर आता ते राजस्थानला जात आहेत. या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आता महाराष्ट्राबाहेरही आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे.