एकेकाळी होती इंदिरा गांधी यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता मिझोरमचे सीएम होणार
झेडपीएमच्या यशाबद्दल पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार लालडुहोमा यांनी पार्टीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या दोन दिवसात राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असे त्यांनी म्हटले आहे. लालडुहोमा हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सिक्युरिटी इंचार्ज होते आणि कॉंग्रेसचे खासदार देखील होते.
मुंबई | 4 डिसेंबर 2023 : मिझोरम विधानसभा निवडणूकांमध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला ( एमएनएफ ) हरविल्यानंतर झोरम पिपुल्स मुव्हमेंटचे ( झेडपीएम ) नेते लालडुहोमा चर्चेत आले आहेत. मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत. मिझोरमच्या 40 जागांचा निकाल आला आहे. 27 जागा जिंकून झेडपीएम सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ताधारी एमएनएफला 10, भाजपाला 2 आणि कॉंग्रेसला 1 जागा जिंकता आली आहे. परंतू लालडुहोमा यांचा इतिहास आश्चर्यकारक आहे. लालडुहोमा आयपीएस अधिकारी होते. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.
मिझोरमच्या सर्वात मोठा उलटफेर आयझोल ईस्ट-1 या जागेवर झाला. येथे मुख्यमंत्री जोरामथंगा निवडणूक हारले आहेत. त्यांना झेडपीएमच्या ललथनसंगा यांनी 2 हजार मतांनी हरविले आहे. पराभवानंतर मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला आहे. आयपीएस अधिकारी लालडुहोमा हे 1980 च्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेचे प्रमुख होते. साल 1982 मध्ये त्यांना आसामवरुन दिल्लीत बदली करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
इंदिरा गांधींनी मिझोरमला पाठविले
इंदिरा गांधी यांना माहीती होते की साल 1977 मध्ये आयपीएस बनण्यापूर्वी ते राज्य प्रशासकीय सेवेत होते आणि एक अधिकारी म्हणून त्यांनी मिझोरमचे पहिले मुख्यमंत्री सी चुंगचे यांच्यासोबत काम केले होते. लालडुहोमा यांच्या राजकीय ज्ञानाला पाहून इंदिरा गांधी यांनी त्यांना 1984 मध्ये पुन्हा मिझोरमला पाठविले. त्यानंतर त्यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आणि लोकसभेचे सदस्य बनले. त्यांच्यावर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
शांततेसाठी पुढाकार
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी लालडेंगा यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरासोबत ऐतिहासिक सामंजस्य करार करून पूर्वोत्तर राज्यात शांततेसाठी पुढाकार घेतला होता. जोरमथंगा तेव्हा मिझो बंडखोर नेत्यांपैकी एक होते. शांतता करारानंतर लालडेंगा मिझोरमचे मुख्यमंत्री बनले. माजी मुख्यमंत्री ललथनहवला यांच्याशी न पटल्याने लालडुहोमा यांनी कॉंग्रेस सोडली आणि मिझो नॅशनल युनियनची स्थापना केली. त्यानंतर अन्य एक माजी मुख्यमंत्री टी सेलो यांच्या नेतृत्वाखाली पिपुल्स कॉन्फेंसमध्ये सामील झाले.
संघर्षाचा इतिहास
लालडेंगाच्या मृत्यूनंतर लालडुहोमा यांनी त्यांचे उत्तराधिकारी जोरमथांगा यांच्याशी न पटल्याने त्यांनी झोरम नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली. आणि 2003, 2008 मध्ये आमदार बनले. त्यांनी 2018 मध्ये विधानसभा निवडणूकांपूर्वी जेएनपी आणि काही अन्य प्रादेशिक पक्षांसोबत झेडपीएमची स्थापना केली. त्यावेळी नवीन पक्षाने आठ जागा जिंकल्या. एक दशक सत्तेत राहिल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला मुख्य विरोधी पक्ष म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फेकले. परंतू निवडणूक आयोगाने तरीही त्यांना पक्ष म्हणून मान्यता दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्या होत्या. लालडुहोमा यांनी त्यावेळी सेरचिप येथे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री ललथनहावला यांना हरवले होते. त्यानंतर झेडपीएमला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि ते पक्षाचे अध्यक्ष झाले.