Video : “अजून पण वेळ गेली नाही, विचार कर…”, लालू यादव यांनी राहुल गांधी यांना सल्ला देताच हास्यकल्लोळ
Opposition Parties Meeting: भाजपा सरकार विरोधात विरोधकांची एकजूट दिसली. या बैठकीला भाजपाला विरोध करणाऱ्या प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लालू प्रसाद यादव यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
पाटणा : केंद्रातील भाजपाची एकहाती सत्ता खेचून आणण्यासाठी विरोधकांनी आपली रणनिती सुरु केली आहे. भाजपा विरोधात असलेल्या पक्षांची एक बैठक बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात आयोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुखे लालू प्रसाद यादव जुन्या अंदाजात पाहायला मिळाले. बोलता बोलता काही कोपरखळ्या मारल्या. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्लाही दिला. लालू प्रसाद यादव यांचा हटके सल्ला ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही.
काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
पत्रकार परिषदेत लालू प्रसाद यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली. तसेच चांगलं काम करत असल्याची पोचपावती दिली. यावेळी उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर टीका करण्यास विसरले नाही. एकंदरीत पत्रकार परिषद रंगली असताना राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय त्यांनी काढला. राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं असं ते भर पत्रकार परिषदेत म्हणाले.
“राहुल गांधी यांनी आता लग्न केलं पाहीजे. अजूनही वेळ गेलेली नाही. सोनिया गांधी सांगतात की राहुल त्यांचं ऐकत नाही. जर तुम्ही लग्न केलं तर आम्ही सर्व वरातील सहभागी होऊ.”, असा सल्ला लालू प्रसाद यादव यांनी देताच एकच हशा पिकला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “तु्म्ही सांगत आहात तर लग्नही होईल.”
“विरोधक एकत्र नसल्याने भाजपाचा विजय होतो. आम्हाला एकत्रितपणे लढणं गरजेचं आहे. देशात दुही माजली आहे. भेंडी 60 रुपये किलो झाली आहे. देशात हिंदू मुस्लिम घोषणा देत हनुमानाच्या नावावर निवडणुका लढवल्या जात आहेत. पण यावेळी कर्नाटकात हनुमानजी नाराज झाले आणि गदा मारली. त्यानंतर राहुल गांधी यांची काँग्रेस पार्टी जिंकली.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सपा प्रमुख अखिलेश याददव, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, एसीपी अध्यक्ष शरद पवार, द्रमुक नेते आणि मुख्यमंत्री एम के स्टालिन, नॅशनल कॉन्फरन्स नेते उमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती, भाकपाचे महासचिव डी राजा, माकपाचे महासचिव सीताराम येच्युरी आणि इतर नेते उपस्थित होते.