बहरामपूर | 2 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. यावेळी त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. हिंमत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे. तसं मला वाटतं. कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
डिजिटल मीडिया योद्धांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसने जे नियम घालून दिलेत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा सारख्या लोकांनी काँग्रेसमधून निघून जावं. मी या मतावर येऊन ठेपलो आहे. हिमंत हे एका विशेष प्रकारच्या राजकारणाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. हे काँग्रेसचं राजकारण नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. 25 जानेवारी रोजी ही यात्रा आसाममध्ये आली. तिथून ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. आता पुढच्या टप्प्यात ही यात्रा झारखंडमध्ये जाणार आहे.
मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोडून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे आता देवरा यांचा भाजपसोबतचा नवा प्रवास सुरू झाला आहे. तर हिमंत बिस्वा यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला होता. 2014 मध्येच हिमंत बिस्वा हे भाजपमध्ये आले. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पक्षांतर्गत वादाला कंटाळून काँग्रेस सोडली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं होतं.
देशात भाजपचं सरकार आल्यापासून काँग्रेसला अनेक दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प३साद, सुनील जाखड, प्रियंका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, सुष्मिता देव आणि आरपीएन सिंह आदी नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेस सोडताना प्रत्येकांनी वेगवेगळी कारणे दिली होती.
दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ धरली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं अस्तित्व निवडणुकीआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.