Lok Sabha Election | आचार संहिता म्हणजे काय ? कधी लागू होतो कोड ऑफ कंडक्ट ?
पूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघे काही तास उरले आहेत. आज, 16 मार्च ( शनिवार) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. पण निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ? ती कोण लागू करतं ?
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघे काही तास उरले आहेत. निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यानुसार, आज, 16 मार्च रोजी ( शनिवार) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात किंवा आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
तसेच आज ओदिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होईल.
अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ? ती कोण लागू करतं ? या दरम्यान कोणती कार्य बंद राहतात, आणि कोणती कामं सुरू राहतात ? या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
आचार संहिता म्हणजे काय ?
देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसबा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये संसद आणि राज्य विधानमंडळांच्या मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्याचे पालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. आचारसंहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. आचार संहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे.
आचार संहिता कधीपर्यंत असते प्रभावी ?
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते. यावेळी आचारसंहिता आजपासून (16 मार्च 2024) लागू होईल. कारण आज निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आचारसंहिता समाप्त होते.
सामान्य लोकांनाही नियम लागू
एखाद्या सामान्य व्यक्तीनेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचार संहितेच्या नियमांतर्गत कारवाई केली जाते. म्हणजेच, तुम्ही जर एखाद्या राजकीय नेत्यासाठी प्राचर करत असाल तर तुम्हालाही आचार संहितेच्या नियमांबद्दल जागरूक रहावे लागेल. एखादा राजकीय नेता तुम्हाला या नियमांबाहेर जाऊन काम करण्यास सांगत असेल तर तुम्ही त्यांना आचार संहितेच्या नियमांबद्दल सांगून असे करण्यापासून रोखू शकता. कारण असे कोणतेही कार्य केल्यास कारवाई होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास अटकही होऊ शकते.
आचार संहिते उल्लंघन केल्यास काय होतं ?
निवडणूक आचार संहिता लागू झाल्यावर अनेक नियमही लागू होतात. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता, या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. याशिवाय, निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी, गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवहार, लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे, भीती घालणे यासारख्या कारवायांना आळा बसेल याचीही काळजी घेतली जाते. याचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाते. एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो. (संबंधित) उमेदवाराला निवडणूक लढण्यापासूनही रोखता येते. तसेच त्याच्याविरोधात FIRही दाखल केली जाऊ शकते. दोषी सिद्ध झाल्यास त्या संबंधित उमेदवाराला तुरूंगातही जावे लागू शकते.