10 वर्षाची शिक्षा झालेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ खासदाराची खासदारकी बहाल, काय आहे प्रकरण?; राहुल गांधी यांना पर्याय काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रवादीच्या एका खासदाराची 10 वर्षाची शिक्षा झाली होती म्हणून खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्याची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला. संसदेच्या या कारवाईमुळे देशभरात चर्चांना उधाण आलं. या निमित्ताने भाजपवर टीकाही होऊ लागली आहे. ही घटना ताजी असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांचीही खासदारकी रद्द करण्यात आली होती. दहा वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र, संसदेच्या सचिवालयाने मोहम्मद फैजल यांना खासदारकी बहाल केली आहे. विशेष म्हणजे फैजल यांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यापूर्वीच सचिवालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांना हत्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. स्थानिक कोर्टाने त्यांना 11 जानेवारी रोजी दहा वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा सचिवालयाने फैजल यांची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या जागेवर पोटनिवडणूक घेण्याचं घोषित केलं होतं. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या खासदार किंवा आमदाराला एखाद्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली असेल किंवा त्यापेक्षा अधिक काळाची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. याच कायद्यानुसार आधी फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.त्यानंतर एका प्रकरणात राहुल गांधी दोषी आढळल्यानंतर सुरत कोर्टाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे.
केरळ उच्च न्यायालयात आव्हान
दरम्यान, मोहम्मद फैजल यांनी सेशन कोर्टाच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांची शिक्षा रद्द केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पोटनिवडणूकही रद्द करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याची शिफारस लोकसभा सचिवालयाला केली. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यांना सदस्यत्व बहाल केलं आहे.
आशा पल्लवित
दरम्यान, मोहम्मद फैजल यांच्याबाबतचा घेण्यात आलेला निर्णय राहुल गांधी यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कोर्टाने त्यांची शिक्षा रद्द केल्यास राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.