Congress Manifesto | 450 रुपयांत सिलिंडर, अग्निवीर योजना बंद, कुणाच्या जाहीरनाम्यात कोणत्या घोषणांची शक्यता?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा समितीची बैठक झाली. बुधवारी पुन्हा कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर हा जाहीरनामा मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.
नवी दिल्ली | 5 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर देश उभा आहे. निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासोबतच पक्षाचा जाहीरनामा बनविण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी मात्र भारत न्याय यात्रेत व्यस्त आहेत. 20 मार्चला राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा मुंबईत समारोप होणार आहे. पण, त्यांच्या अनुपस्थितीत कॉंग्रेस मात्र निवडणुकीची रणनीती आखत आहे. कॉंग्रेस आपल्या उमेदवरांची यादी आधी जाहीर करणार आहे. त्यानंतर आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे अशी माहिती कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात तरुण, शेतकरी, गरीब आणि मागासलेल्या लोकांवर भर असेल. तसेच हा जाहीरनामा तरुण आणि महिलांच्या समस्यांवर आधारित असेल. काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या जाहीरनाम्यामधून मोदी सरकारची महत्वाची योजना अग्निवीर ही योजना बंद करणे, एमएसपी लागू करणे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणे, 450 रुपयांत सिलिंडर देणे अशा घोषणा असू शकतात अशी माहितीही या सूत्रांनी दिली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कॉंग्रेस मोठ्या प्रमाणावर प्रचाराची तयारी करत आहे. त्याचप्रमाणे, देशात बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. याशिवाय शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात कपात, केंद्रातील लाखो रिक्त पदांवर भरती करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यामधून दिले जाऊ शकते.
महिलांसाठी काय वचन?
प्राप्त माहितीनुसार हिमाचल प्रदेश काँग्रेस सरकारने लागू केलेली महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना ही देशभरातील महिलांसाठी लागू करण्याची घोषणा काँग्रेस करू शकते. गृहलक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात थेट 1500 रुपये जमा करण्यात येतात.
वीज आणि सिलेंडर स्वस्त करणार?
कॉंग्रेस आपल्या जाहीरनाम्यात स्वस्त वीज आणि 450 रुपयांमध्ये सिलिंडर देण्याचे आश्वासनही देऊ शकते. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची ही लोकप्रिय घोषणा होती. सोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासनही कॉंग्रेसकडून देण्याची शक्यता आहे.
रेल्वे तिकीट दरात कपात?
रेल्वे तिकीट दर कमी करणे, वृद्धांना दिलेल्या सवलती पुन्हा सुरु करणे, त्याचबरोबर लघुउद्योगांना स्वस्त दरात कर्ज देणे, शेतकऱ्यांसाठी एमएसपी लागू करणे आधी आश्वासनही कॉंग्रेस आपल्या जाहिरनाम्यामधून देण्याची अधिक शक्यता आहे.