भाजपने दक्षिणेत पाय रोवले, या पक्षाला घेतले जवळ, 24 तासात जागावाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेकडील राज्यांमधून किमान 50 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. अशावेळी तामिळनाडूमध्ये PMK पक्षासोबत केलेली युती भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहे.
नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश राज्यातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेत भाजप NDA मधील घटकपक्षांची संख्या वाढवत आहे. या राज्यानंतर भाजपने दक्षिणेतील राज्यांमध्ये आपले पाय रोवायला सुरवात केली आहे. दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील अंबुमणी रामदास यांच्या पट्टाली मक्कल काची या पक्षासोबत भाजपने युतीची घोषणा केली. सकाळी युतीची घोषणा झाल्यानंतर रात्री बैठक घेऊन लगेच उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली. तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आणि पीएमकेचे संस्थापक अंबुमणी रामदास यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर या यादीवर शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. या युतीचा भाजपला तामिळनाडूत फायदा होऊ शकतो असे मानले जात आहे.
अंबुमणी रामदास यांच्या पट्टाली मक्कल काची (PMK) या पक्षाचा राज्यातील वन्नियार समुदायामध्ये प्रभाव आहे. उत्तर तामिळनाडूमधील मोठ्या क्षेत्रावर अंबुमणी यांच्या पक्षाची पकड आहे. त्यामुळे दक्षिणेतील या मोठ्या राज्यात आजवर जनाधार न मिळलेल्या भाजपने PMK पक्षाची साथ घेत येथे पक्षाचे पाय रोव्ण्यात्स सुरवात केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेकडील राज्यांमधून किमान 50 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. अशावेळी तामिळनाडूमध्ये PMK पक्षासोबत केलेली युती भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहे. एवढेच नाही तर या समीकरणामुळे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुक यालाही धक्का देण्यात भाजप यशस्वी झाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात याआधी अण्णाद्रमुक आणि पीएमके यांची युती होती. अण्णाद्रमुक हा पूर्वी NDA चा घटकपक्ष होता. मात्र, 2004 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुक युतीचा मतदारांनी दारुण पराभव केला. त्यामुळे तत्कालीन सरचिटणीस जयललिता यांनी यापुढे भाजपसोबत कधीही युती करणार नसल्याची घोषणा केली होती.
जयललिता यांच्या मृत्यूपर्यंत अण्णा द्रमुक पक्षाने विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केली नाही. मात्र, त्यांच्या निधनानंतर 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुक हे पक्ष पुन्हा एकत्र आले. 2021 च्या विधानसभा निवडणुकाही या दोन्ही पक्षांनी एकत्र लढविल्या. पण, दोन्ही निवडणुकीत युतीचा पराभव झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी आम्ही थेट द्रमुकविरोधात लढणार असे विधान केल्याने दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली.
याचदरम्यान अण्णा द्रमुक आणि अंबुमणी रामदास यांच्या PMK यांची युती झाली. अंबुमणी यांनी भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अण्णाद्रमुकला पुन्हा एनडीएच्या छावणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, त्यावर एकमत झाले नाही. अखेर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी थलापुरम गाठले. तेथे पीएमके नेतृत्वासोबत बैठक झाल्यानंतर जागावाटपाचा करार केला. दरम्यान, तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत.