मोठी बातमी : कंगना राणावतची राजकारणात एन्ट्री, भाजपकडून ‘या’ मतदारसंघातून लढणार
भाजपची पाचवी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नावे आहेत. तर बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतलाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगणा कोणत्या मतदार संघातून लढणार जाणून घ्या.
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीआधीच्या तारखा जाहीर झाल्यावर सर्व पक्ष आता उमेदवार जाहीर करत आहे. भाजपची आता पाचवी यादी जाहीर झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचे उमेदवारांची नावे समोर आली आहेत. भाजपचे माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचं नाव आहे. जी दुसरी नावे आहेत त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये एक कलाविश्वातील मोठं नाव बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कंगना राणावत कुठून लढणार?
कंगना राणावतला हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी लोकसभा मदतदार संघात आता काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विद्यमान खासदार आहेत. ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने कंगनाला उमेदवारी देत मोठा डाव खेळला आहे. कंगना ही कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील तीन उमेदवार कोणते?
पाचव्या यादीमध्ये भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामधील सुनील मेंढे आणि अशोक नेते हे विद्यमान खासदार असून त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. राम सातपुते यांनी तिकीट देत भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापलं आहे. काँग्रेसकडून सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना तिकीट दिलं आहे. प्रणिती शिंदे आमदार असून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, भाजपकडून याआधी 20 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे.