लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात मतदान; कुणाकडे किती संख्याबळ? काय आहे गणित?
Loksabha Speaker Election 2024 : लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात मतदान सुरु होणार आहे. कुणाकडे किती संख्याबळ? काय आहे गणित? बहुमताचा आकडा किती? कोणत्या पक्षाच्या खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे? याबाबत जाणून घेऊयात... वाचा सविस्तर बातमी....
लोकसभा अध्यत्रपदाच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदार होणार आहे. एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी अशी ही निवडणूक पार पडणार आहे. एनडीकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून कोडीकुन्निल सुरेश यांच्यात ही लढत होत आहे. राजस्थानच्या कोटा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या ओम बिर्ला यांना एनडीएने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. तर केरळच्या मवेलीकारा या मतदारसंघातून आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या कोडीकुन्निल सुरेश यांना इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे.
कुणाकडे किती संख्याबळ?
लोकसभेची सदस्यसंख्या 543 आहे. यापैकी 542 खासदार सध्या संसदेत खासदार उपस्थित आहेत. कारण राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. केरळमधल्या वायनाडच्या जागेवर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे एक खासदाराची संख्या कमी झाली आहे. यातील 293 खासदारांचं एनडीएला समर्थन आहे. तर इंडिया आघाडीचे 233 खासदार निवडून आले आहेत. 16 अपक्ष खासदारांनी इंडिया आघाडीला समर्थन दिलं तर इंडिया आघाडीकडे 249 खासदार असतील. तर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 271 हा बहुमताचा आकडा आहे.
लोकसभेची 542 खासदारांपैकी 535 खासदारांचा काल शपथविधी झाला. उर्वरित 7 खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एनडीकडून ओम बिर्ला की इंडिया आघाडीचे कोडीकुन्निल सुरेश कोण ही निवडणूक जिंकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवतील. मग यासाठीचं मतदान पार पडेल.
TDP च्या खासदारांना व्हीप जारी
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पार्टी अर्थात TDP च्या 16 खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांना मतदान करण्यासाठीचा व्हीप जारी करण्यात आला आहे. अमलापूरचे खासदार हरीश बालयोगी यांनी सगळ्या खासदारांची बैठक घेतली. यावेळी एनडीएच्या समर्थनार्थ मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात होणाऱ्या या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे.