Narayan Rane : विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान, कुटुंबीयांना भेटणार म्हणत नारायण राणेंनी व्यक्त केलं दु:ख
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असे ते नेते होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध मार्ग अवलंबत, आंदोलने करत सतत पाठपुरावा केला, असे नारायण राणे म्हणाले.

नवी दिल्ली : विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघाती मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेबद्दल मी शोक व्यक्त करतो. मी त्यांच्या घरी भेट देणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. आज पहाटे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यानंतर राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. नारायण राणे यांनीदेखील विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असे ते नेते होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध मार्ग अवलंबत, आंदोलने करत सतत पाठपुरावा केला, असे नारायण राणे म्हणाले.
कुटुंबीयांचे करणार सांत्वन
आज पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची कार एका कंटेनरला जोरदारपणे धडकली. यामुळे गाडीच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाला. विनायक मेटे डाव्या बाजूलाच बसले असल्याने यात ते गंभीर जखमी झाले. डोक्याला प्रचंड मार लागला. तासभर मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे प्राण गेले. याप्रकरणी त्यांचा चालक एकनाथ कदम याला ताब्यातही घेण्यात आले आहे. दरम्यान, जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या बीड जिल्ह्यातील मूळ गावी नेण्यात येणार असून तेथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर नारायण राणे त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करणार आहेत.



काय म्हणाले नारायण राणे? आक्रमक भूमिकेचे कौतुक
विनायक मेटेंच्या मराठा समाजाच्या मागण्यांबाबतच्या आक्रमक भूमिकेचे नारायण राणे यांनी कौतुक केले. आता आपण विनायक मेटेंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याचे राणे म्हणाले. दरम्यान, यावेळी नाराण राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. आम्ही कुठला सण साजरा करावा, हे आम्ही ठरवू. कोण उद्धव ठाकरे? ते आमचे बॉस नाहीत. त्यांचा काय संबंध? ते मुख्यमंत्री झाले हा महाराष्ट्राला काळीमा, दहा वर्षे महाराष्ट्र मागे गेला, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी केली.