एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट, ‘हिंदुत्व की आन, महाराष्ट्र की शान’; स्वागतासाठी गुवाहाटीच्या रस्त्यांवर 100 होर्डिंग्ज
आमदार ज्या मार्गाने विमानतळाहून हॉटेलकडे जाणार आहेत, त्याच मार्गावरील पोलवर हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी भगवे झेंडेही लावण्यात आले आहेत.
गुवाहाटी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. काही वेळातच ते गुवाहाटी विमानतळावर त्यांचं विमान लँड होणार आहे. शिंदे आपल्या समर्थकांसह गुवाहाटीला येणार असल्याने आसाम सरकार त्यांचं स्वागत करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आसाम सरकारचे स्टेट गेस्ट असणार आहेत. त्यामुळे गुवाहाटी विमानतळावर त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तसेच गुवाहाटीच्या रस्त्या रस्त्यावर शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळावर रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. या ठिकाणी आसाम सरकारच्या वतीने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर शिंदे आणि त्यांचे सहकारी हॉटेल रेडिसन ब्ल्यूकडे रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळ ते हॉटेल रेडिसन ब्ल्यूपर्यंतच्या रस्त्यांवर होर्डिंग्ज लागले आहेत. या रस्त्यावर किमान 100 होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. कट्टर शिंदे समर्थक किरण पांडव आणि गुवाहाटीचे व्यावसायिक सुदर्शन डागा यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत.
या होर्डिंग्जवर हिंदुत्व की आन, महाराष्ट्र की शान असं लिहिण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना असंही या होर्डिंग्जवर लिहिण्यात आलं आहे. होर्डिंग्जवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो छापण्यात आले आहेत.
आमदार ज्या मार्गाने विमानतळाहून हॉटेलकडे जाणार आहेत, त्याच मार्गावरील पोलवर हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी भगवे झेंडेही लावण्यात आले असून त्यावर धनुष्यबाणाचं चिन्हंही दिसत आहे.
आज दुपारी शिंदे आणि त्यांचे सहकारी गुवाहाटीला पोहोचतील. त्यानंतर ते हॉटेल रेडिसन ब्ल्यूला जातील. तिथे चहापाणी झाल्यानंतर हे सर्व नेते माँ कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने जातील.
हॉटेलपासून मंदिर अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे हे सर्वजण बसने देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांसोबत हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये उतरणार असल्याने त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कामाख्या मंदिर परिसराभोवतीही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.