बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांना दहा हत्तीचं बळ देण्यासाठी लेक विधीता दिल्लीत!
'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' या संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विधीताला विचारण्यात आलं. त्यावर विधीता म्हणाली, 'बाबांनी ठरवलंय, तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत (Maharashtra Political Crisis). नवी दिल्ली हे महाराष्ट्राचं नवं सत्ता केंद्र झालं आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा निर्णय हा दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार आहे. या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील सध्या दिल्लीत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर अॅन्जिओप्लास्टीची शस्रक्रिया झाली. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या घडामोडीत संजय राऊत हे तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहेत. त्यासाठी संजय राऊतांचे कुटुंबीयही दिल्लीत त्यांच्यासोबत आहेत. यावेळी संजय राऊत यांची मुलगी विधीताने (Sanjay Raut Daughter Vidhita) ‘टीव्ही-9 मराठी’शी संवाद साधला. ‘बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, अशी प्रतिक्रिया विधीताने दिली.
‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ या संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विधीताला विचारण्यात आलं. त्यावर विधीता म्हणाली, ‘बाबांनी ठरवलंय, तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’. तसेच, ‘या सर्व घडामोडींमध्ये कुटुंब नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. बाबा जे बोलतात ते करुन दाखवतात, त्यापेक्षा जास्त मी काहीही बोलू शकत नाही’, असं विधीता म्हणाली. तसेच, ‘बाबांनी म्हटलंय म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल’, असा विश्वास विधीताने दर्शवला
संजय राऊत घरात आक्रमक आहेत की शांत?
‘ते घरात फक्त बाबा असतात. एखाद्या सामान्य वडीलांसारखे ते वडील आहेत’, असं विधीताने वडिलांबाबत सांगितलं.
संजय राऊत यांच्या तब्येतीची काळजी कशी घेता?
‘ते खाण्याच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध आहेत. फक्त त्यांच्या औषधांकडे लक्ष द्यावं लागतं. एरवीही ते कमी तेलकट खातात. त्यामुळे त्यांच्या डाएटची काळजी घ्यावी लागत नाही. दिल्लीतही त्यांची काळजी घेणारे खूप आहेत आणि त्यांच्या डाएटचीही पूर्ण काळजी घेतली जाते’, अशी माहिती विधीताने दिली.