1,900 साड्यांच्या प्रदर्शनात खुलून दिसली महाराष्ट्राची पैठणी, काश्मीरची काशिदा आणि केरळची कासवूलाही टाकलं मागे
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशभरातून आलेल्या काश्मीरची काशिदा ते केरळची कासवूपर्यंत 1,900 साड्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यामध्ये महाराष्ट्राची पैठणीच सर्वाधिक खुलून दिसत होती. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या साड्यांवर क्यूआर स्कॅनर बसवण्यात आले होते.
नवी दिल्ली | 26 जानेवारी 2024 : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पथावर राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचे अनोखे प्रदर्शन घडले. महिला शक्ती आणि स्वावलंबी भारताची झलक दिल्लीत कर्तव्याच्या मार्गावर दिसली, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘अनंत सूत्र-द एंडलेस थ्रेड’च्या माध्यमातून साड्या आणि पडद्यांचे अनोखे प्रदर्शन दाखवले. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या आकर्षक साड्या आणि पडद्यांचा समावेश होता. कर्तव्य पथ येथे लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या जागेमागे सुमारे 1,900 साड्या सजवण्यात आल्या होत्या. लाकडी चौकटीवर उंचावर बसविण्यात आलेल्या या या साड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशभरातून आलेल्या काश्मीरची काशिदा ते केरळची कासवूपर्यंत 1,900 साड्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यामध्ये महाराष्ट्राची पैठणीच सर्वाधिक खुलून दिसत होती. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या साड्यांवर क्यूआर स्कॅनर बसवण्यात आले होते. क्यूआर कोड स्कॅन करून साड्यांवर केलेली भरतकाम आणि विणकामाची माहिती लोकांना घेता येईल हा यामागील उद्देश होता.
सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसचिव अमिता प्रसाद यांनी याची माहिती देताना सांगितले की, प्रदर्शनात दीडशे वर्षे जुन्या साड्यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन देशातील महिला आणि विणकरांना समर्पित असल्याचे त्या म्हणाल्या. तर, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की. या देशातील जनतेने राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे सूत्र मजबूत केले आहे. त्यामुळेच प्रदर्शनाला अनंत सूत्र असे नाव देण्यात आले आहे. याचा एक खोल अर्थ आहे असेही त्यांनी सांगितले.
अनंत सूत्र या प्रदर्शनात काश्मीरची काशिदा, केरळची कासवू, पंजाबची फुलकरी, हिमाचलची कुल्लुवी पट्टू, बिहारची भागलपूर सिल्क, आसामची मुगा, मणिपूरची मोइरांग फी, पश्चिम बंगालची तांत, ओडिशाची बोमकाई, छत्तीसगडची कोसा, तेलंगणाची पोचमपल्ली, तामिळनाडूचे कांजीवर, मध्य प्रदेशची चंदेरी, गुजरात पटोला, राजस्थानचे कोटा/लहरिया, उत्तर प्रदेशातील बनारसी साडी आणि महाराष्ट्रीयन पैठणी या साड्यांचा समावेश होता.
महिला बँड पथकाची दर्जेदार कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर भारतीय सशस्त्र दलातील शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर प्रजासत्ताक दिन 2024 साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
यंदा प्रजासत्ताक दिनाची थीम ‘विकसित भारत’ आणि ‘इंडिया – मदर ऑफ डेमोक्रसी’ अशी होती. सुमारे तेरा हजार विशेष पाहुणे परेडला उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रथमच या परेडची सुरुवात शंभरहून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून केली.