महायुतीच्या नेत्यांची तिसरी दिल्लीवारी, नवी दिल्लीत रात्रभर हालचाली, अखेर काय झाला निर्णय
lok sabha election 2024: बैठक संपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत सकाळी ५.३० वाजता दाखल झाले. पेच असलेल्या जागांबाबत या बैठकीत निर्णय झाला. कोणाला किती जागा दिल्या त्याची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आज किंवा उद्या यावर निर्णय होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा विषय सुटलेला नाही. राज्यातील जागा वाटपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री बैठक झाली. महायुतीच्या नेत्यांची ही तिसरी दिल्लीवारी होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दीड तास झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहाटे ५.३० वाजता वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत दाखल झाले. या बैठकीत पेच असलेल्या जागांवर निर्णय झाल्याची माहिती आहे. यामुळे आज किंवा उद्या महायुतीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या विमानांनी नेते राज्यात
लोकसभेसाठी भाजपने आपल्या २० जागांवर उमेदवारी जाहीर केली आली. परंतु महायुतीच्या २८ जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. या जागांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मध्यरात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर रात्री दीड तास बैठक झाली.
बैठक संपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत सकाळी ५.३० वाजता दाखल झाले. पेच असलेल्या जागांबाबत या बैठकीत निर्णय झाला. कोणाला किती जागा दिल्या त्याची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आज किंवा उद्या यावर निर्णय होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या विद्यामान खासदारांना उमेदवारी दिली जाणार की नाही? याबाबत निर्णय झाला आहे.
उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब
उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. सातारा लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दिल्लीत शनिवारी भाजप नेते आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उदयनराजे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला उदयनराजे भोसले उपस्थित होते.
इकडे खासदार गावित यांचा प्रचार सुरु
महायुतीकडून पालघर लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नाही. मात्र शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचाराची सुरवात केली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना वसई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला केली सुरवात केली. वसईत त्यांनी पदाधिकारी संवाद मेळावा घेऊन लोकसभेच्या प्रचारासाठी कामाला लागण्याचे आदेश पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.