मालदीवच्या मंत्रिमंडळाने बुलेट ट्रेनच्या साईटला दिली भेट, समुद्राखालील पहिल्या बोगद्याचे काम पाहीले
बुलेट ट्रेनच्या रुळांना टाकण्याचे काम सुरु झाले आहे. भारतात पहिल्यांदा अशा प्रकारचे बलास्ट लेस ट्रॅक अंथरण्यात येत आहेत. या बुलेट ट्रेनच्या देशातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे बांधकाम सुरु आहे. या साईटला मालदीवच्या मंत्रिमंडळाने भेट देऊन कामाची पाहणी केली आहे.
मुंबई: मालदीवचे बांधकाम आणि पायाभूत सुविधा मंत्री डॉ. अब्दुल्ला मुथ्थालिब यांच्या नेतृत्वाखालील मालदीवच्या वरिष्ठ मंत्री स्तरीय शिष्टमंडळाने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला भेट दिली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निमंत्रणावरून भारतात आलेल्या या शिष्टमंडळाने हाय-स्पीड रेल्वेच्या C-2 पॅकेजचा दौरा केला. या पॅकेजचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करीत आहे. या C-2 पॅकेजमध्ये 21 किमी बोगद्याचा देखील समावेश आहे, ज्यात भारतातील पहिल्या समुद्राखालील हायस्पीड रेल्वे बोगद्याचा (7 किमी) समावेश आहे.
या शिष्टमंडळात बांधकाम आणि पायाभूत सुविधा राज्यमंत्री इब्राहिम थॉआम मोहम्मद, बांधकाम आणि पायाभूत सुविधा राज्यमंत्री इस्माईल हमीद, कम्युनिकेशन डायरेक्टर अब्दुल्ला मिउवान शरीफ आणि मालदीवचे मोहम्मद जिनान सईद यांचा समावेश होता. मालदीवमधील भारताचे उच्चायुक्त मुनू महावर आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक उदय प्रकाश सिंग सोबत होते. सुनील त्यागी यांच्या नेतृत्वाखालील ॲफकॉन्स टीमने शिष्टमंडळाला बांधकामातील बारकावे समजावून सांगितले.
मालदीवच्या पायाभूत सुविधेला फायदा
यावेळी शिष्टमंडळाने मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या विकासात वापरले जाऊ शकतील अशा संभाव्य तंत्रज्ञानावर यावेळी चर्चा केली आणि भारताच्या पहिल्या समुद्राखालील हायस्पीड बुलेट ट्रेन बोगद्याची माहिती घेतली. मालदीवच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या भेटीने तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि मालदीवमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांना उभारण्यासाठी आयात करता येण्याजोग्या नवीन पद्धती आदी बाबींवर चर्चा देखील करण्यात आली.