कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील विराट सभेनंतर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banejree) यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आव्हान दिले आहे. मी हिंदू कुटुंबातील मुलगी आहे. कोणीही माझ्याविरोधात ‘हिंदू कार्ड’ वापरायची हिंमत करु नये. मी रोज सकाळी घरातून निघताना चंडी पाठाचे स्मरण करते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. (Mamta Banerjee recites Chandipath in rally)
त्या मंगळवारी नंदीग्राम येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्वांदेखत चंडी पाठातील काही श्लोक म्हणून दाखवले. तसेच भाजपच्या नेत्यांनी माझ्यासोबत चंडीपाठ म्हणण्याची स्पर्धा करावी, असे आव्हानही ममता बॅनर्जी यांनी दिले.
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी नंदीग्राम मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ केला. या मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसमधील माजी सहकारी आणि भाजप नेते सुवेन्दू अधिकारी यांचे कडवे आव्हान आहे. मात्र, नंदीग्रामची जनता 1 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानावेळी भाजपचा एप्रिल फूल करेल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
Must Watch @MamataOfficial reciting #ChandiPath pic.twitter.com/IR1Ju8ls1X
— Singh Varun (@singhvarun) March 9, 2021
नंदीग्राममधील या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. नंदीग्राममध्ये काहीजण मला उपरी (बाहेरची) म्हणतात. मात्र, माझे बालपण हे शेजारच्या बीरभूम जिल्ह्यात गेले आहे. आज मी तुमच्यासाठी उपरी झाली आहे आणि गुजरातमधून आलेले लोक तुम्हाला अधिक जवळचे वाटत आहेत का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.
तुमची इच्छा नसेल तर मी नंदीग्रामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. तुम्ही मला तुमची मुलगी मानलं तरच मी नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरेन, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. यानंतर 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच 57 उमेदवारांची पहिला यादी जाहीर केली. यामध्ये नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सुवेन्दू अधिकारी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. नंदीग्राम मतदारसंघातील ही लढत पश्चिम बंगालमधील सर्वात हाय-प्रोफाईल लढत मानली जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत केलेल्या चंडी पाठाची सध्या पश्चिम बंगालमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममतांना टोला लगावला आहे. 10 वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर ममता बॅनर्जी यांना हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी चंडी पाठ का करावा लागतो. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जनतेला साद घातली पाहिजे. त्यांच्याकडून अशी काय चूक घडली की व्यासपीठावर त्यांच्यावर चंडी पाठ करण्याची वेळ ओढावली, असा सवाल कैलास विजयवर्गीय यांनी उपस्थित केला.
(Mamta Banerjee recites Chandipath in rally)