केंद्रिय तपास यंत्रणांविरोधात ममतांचा पुन्हा एल्गार…
ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रिय तपास यंत्रणांविरोधात नेहमीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दंड थोपटले आहेत. आताही त्यांनी थेट या यंत्रणाविरोधात निषेध ठराव मांडणार आहेत, त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी नेहमीच केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आवाज उठवला आहे. आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी केंद्रीय तपास यंत्रणेविरोधात एल्गार दिला असून सोमवारी विधानसभेत तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) निषेधाचा ठराव मांडणार आहे. केंद्रीय एजन्सींचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढत असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसकडून निषेध ठराव मांडला जाणार आहे. सोमवारी विधानसभेत हा ठराव मांडताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे तृणमूलकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षक भरती घोटाळा, कोळसा घोटाळा, प्राण्यांची तस्करी अशा अनेक प्रकरणांची सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू आहे. तसेच माजी मंत्री पार्थ चॅटर्जी, तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रता मंडल यांच्यासह अनेकांना अटकही केली गेली आहे.
कोळसा तस्करी प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी, त्यांची पत्नी रुचिरा बॅनर्जी आणि मेहुणी मनेका गंभीर यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली गेली आहे. या मुद्यावरुन भाजपने आक्षेप घेतला असून भाजप-तृणमूल वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना चालू अधिवेशनातच भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी करणारा ठराव आणणार होते. मात्र सभापती बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा वाद आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडी-सीबीआय पुढे सरसावले आहे, परंतु त्या मुद्याला बगल देत सत्ताधारी पक्ष ईडी-सीबीआय सक्रिय असल्याच्या निषेधार्थच हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
विधानसभेत उद्या हा प्रस्ताव मांडला जात असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या या घटना घडामोडींकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर त्याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी हेही विधानसभेत वेगळ्या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत असून उद्या पश्चिम बंगालच्या विधानसभेचत घमासान असल्याचेही बोलले जात आहे.