मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला तो पुन्हा परतलाच नाही, क्रिकेटच्या मैदानात नेमके काय घडले?
मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. सर्व मित्र क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. मात्र सर्व मित्रांना हा खेळण्याचा आनंद अधिक काळ घेता आला नाही. खेळ सुरु असतनाच अचानक जे घडले त्याने सर्वच हादरले.
राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळत असतानाच एका 45 वर्षीय इसमाचा क्रिकेटच्या मैदानात हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना राजकोटमध्ये घडली. गुजरातममध्ये गेल्या दीड महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर झालेला हा आठवा मृत्यू आहे. मयुर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयुरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयुर कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हैराण आहेत.
मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता
राजकोट येथील रेसकोर्स ग्राऊंडच्या शास्त्री मैदानात मयुर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. क्रिकेट खेळता खेळता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर जमिनीवर बसताच तो कोसळला. यानंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला. मयुरच्या मित्रांनी तात्काळ अॅम्बुलन्स बोलावली आणि त्याला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी मयुरला मृत घोषित केले.
हार्ट अटॅकमुळे मयुरचा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयुर पेशाने सोनार होता आणि कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. मयुरच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
अहमदाबादमध्ये क्रिकेट खेळताना जीएसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
याआधी गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीचे कर्मचारी यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला.