जज साहेब… माझी घोर फसवणूक झालीय हो… पत्नीच्या जेंडर टेस्टसाठी नवऱ्याची कोर्टात धाव; आयुष्यात आलं मोठं वादळ
दिल्ली उच्च न्यायालयात एका पतीने आपल्या पत्नीच्या लिंग तपासणीसाठी याचिका दाखल केली आहे. पतीचा दावा आहे की लग्नापूर्वी त्याच्या पत्नीने त्याची फसवणूक केली. त्याने कोर्टाला मागणी केली आहे की केंद्र सरकारच्या रुग्णालयात पत्नीची लिंग तपासणी करावी आणि त्यासाठी येणारा सर्व खर्च तो करायला तयार आहे. ट्रायल कोर्टाने याचिका रद्द केल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे. या प्रकरणात कौटुंबिक हिंसा आणि हुंड्याच्या कायद्याचा आरोपही लावण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात एक अजब खटला दाखल झाला आहे. बायकोच्या लिंग परीक्षणासाठी एका नवऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी तात्काळ आदेश द्यावा अशी विनंती या व्यक्तीने केली आहे. माझी घोर फसवणूक झाली आहे, माझी फसवणूक करून तृतियपंथीयाशी माझं लग्न लावून देण्यात आलं आहे. आता मला मुलं कशी होतील? माझा वंश कसा वाढेल? असा सवाल या व्यक्तीने कोर्टाला केला आहे.
या व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारच्या रुग्णालयात माझ्या पत्नीचं लिंग परीक्षण करण्यात यावं, अशी मागणी त्याने याचिकेत केली आहे. माझी बायको तृतियपंथीय आहे, हे लग्नाच्यावेळी माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. माझी फसवणूक करून माझा तृतियपंथीय व्यक्तीशी विवाह लावून देण्यात आला आहे. या प्रकारामुळे मला मानसिक धक्का बसला आहे. माझं हे लग्न अर्धवट आहे. शिवाय ते बेकायदेशीर आहे, असा दावाही या व्यक्तीने याचिकेत केला आहे.
वकिलांचा युक्तीवाद काय?
या व्यक्तीचे दोन्ही वकील अभिषेक कुमार चौधरी आणि जितेंद्र कुमार तिवारी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. या व्यक्तीचा मानसिक छळ झाला आहे. त्याची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे, असं या वकिलांनी म्हटलं आहे. या प्रकरणात कौटुंबिक हिंसा आणि हुंड्याच्या कायद्याचाही आरोप लावण्यात आला आहे. या याचिकेत जीवन आणि सन्मानच्या मूलभूत अधिकारांमध्ये बॅलन्स राखण्याचं महत्त्वही अधोरेखित करण्यात आलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21 चा हवाला देऊन या गोष्टीवर भर देण्यात आला आहे.
कायद्यात ती महिला नाही
जेंडर तपासणी ही वैयक्तिक बाब आहे. पण लग्नाच्या प्रकरणात या दोन्ही गोष्टी नवरा बायकोच्या अधिकाराला अफेक्ट करतात, असं या याचिकेत म्हटलं आहे. तृतियपंथी असलेल्या महिलेला पत्नीच्या पालनपोषण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष कायद्याच्या अधिकाराअंतर्गत अधिकार मागण्याचा हक्कच नाही. कारण कायदेशीर भाषेत तिला महिला म्हणता येत नाही, असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
खर्च करतो, फक्त तपासणी करा
माझ्या पत्नीची लिंग तपासणी करा. मी त्यासाठी येणारा सर्व खर्च उचलण्यास तयार आहे. गरज पडल्यास मी माझीही वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे, असंही या व्यक्तीने याचिकेत म्हटलं आहे. या आधी या व्यक्तीने ट्रायल कोर्टात जाऊन पत्नीची लिंग चाचणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. पण ट्रायल कोर्टाने त्याची याचिका रद्द केली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या चौकशीच्या अधिकाराशी तडजोड केली जात आहे. पण न्याय मिळण्यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.