सिंहाविरोधात कोल्हे एकत्र; राजस्थानात सिंह कोण आणि कोल्हा कोण?; काही वेळातच होणार स्पष्ट…
दुर्बलांचा गट नेहमीच बलवानांच्या विरोधात वाढत असतो. जेव्हा सिंह जंगलात पळत असतो तेव्हा सर्व कोल्हे एकत्र येतात, मात्र सिंहाशी स्पर्धा करु शकत नाही असा टोलाही त्यांनी गेहलोतांना लगावला.
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022)जाहीर झाल्यापासून राजस्थानातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. काँग्रेस अध्यक्ष पद आणि मुख्यमंत्री पदावरुन गट तट निर्माण होऊन हायकमांडलाच अंगावर घेण्याचं धाडस काही अशोक गेहलोत (Ashok Gehlot) गटातील आमदारांनी केले. त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीने दिल्लीत जाऊन अशोख गेहलोतांच्या राजकीय षडयंत्राचे सगळेच डाव हायकमांडच्या कानावर घातले.त्यामुळे अशोक गेहलोतांची ना घाट का ना घर अवस्था होऊन बसली आहे.
अशोक गेहलोत यांच्याच राजकीय डावपेचामुळे आणि आमदारांच्या उघड बंडामुळे अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यातच आज मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्याकडून सोनिया गांधींना राजस्थानातील लेखी अहवाल सादर केला जाणार आहे.
राजस्थानातील गेहलोत गटातील आमदार इंदिरा मीना, जितेंद्र सिंह, मदन प्रजापती आणि संदीप यादव यांनी आता सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत बोलताना संदीप यादव यांनी सांगितले की, मी हायकमांडसोबतच आहे.
त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर त्याचवेळी मदन प्रजापती यांनी मुख्यमंत्रिपदासाठी पायलट निवडून आल्यास आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंदिरा मीना यांनीही सचिन पायलट यांना आम्ही विरोध केलाच नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री आणि गेहलोत यांचे निष्ठावंत शांती धारीवाल यांच्या घरी बैठक झाली होती, त्या बैठकीला आमदार संदीप यादव उपस्थित राहिले होते. तर आता बाजू पलटी मारत त्यांनी मी मी कोणाच्याही बाजूने नसून मी फक्त हायकमांड सांगितील त्याप्रमाणेच राहणार असंही त्यांनी सांगितले.
तर गेहलोत गटाच्या आमदार इंदिरा मीना यांनी सांगितले की, आम्हाला शांती धारिवाल यांच्या घरी गेल्यानंतर तिथे एका कागदावर सही करायला सांगितली होती. तो कागद आम्हाला वाचायलाही दिला नव्हता. मात्र मी सचिन पायलट यांच्याविरोधात अजिबात नाही, ते जर मुख्यमंत्री झाले तर ते आमच्यासाठी चांगलच आहे असंही त्यांनी सांगितले.
त्यांच्याच सुरात सूर मिसळत आमदार जितेंद्र सिंह यांनी आपणही हायकमांडसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. हायकमांड ज्यांना मुख्यमंत्री करणार आहे, त्यांना आम्ही पाठिंबा देणारच आहे असंही त्यांनी सांगितले.
या सगळ्यात पायलट गटाचे आमदार इंद्रराज गुर्जर यांचेही वक्तव्य समोर आले आहे. गेहलोत गटावर टीका करताना ते म्हणाले की, पायलट ‘बाहेरचे’ नसून ते ‘भारी’ आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
सचिन पायलटांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील आणि देशातील जनतेचे ते लाडके आहेत. त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, निसर्गाचा एक नियम आहे.
दुर्बलांचा गट नेहमीच बलवानांच्या विरोधात वाढत असतो. जेव्हा सिंह जंगलात पळत असतो तेव्हा सर्व कोल्हे एकत्र येतात, मात्र सिंहाशी स्पर्धा करु शकत नाही असा टोलाही त्यांनी गेहलोतांना लगावला. जंगलात सिंहाविरोधात कोल्हे एकत्र आले तरी ते त्याच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले.
पायलट गटातील ओसियनच्या आमदार दिव्या मदेरणा यांनीही “हायकमांड सर्वोपरि है असं म्हटलं आहे. ज्या 92 आमदारांचा आकडा दिला गेला होता तो खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
प्रतापसिंह खाचरियावास खोटे सांगत असून राज्यातील चार जणांनी मिळून ही स्क्रिप्ट तयार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य व्हीप महेश जोशी यांचाही आदेश अनुशासनहीन मानला तरी मी पाळणार नाही, मात्र हायकमांड जो निर्णय घेईल, तो मला मान्यच असेल असंही यावेळी स्पष्ट केले गेले आहे.