मुंबई | 18 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील परासिया विधानसभेचे कॉंग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांचा मुलगा आदित्य याला अटक करण्यात आली आहे. आमदार सोहन वाल्मिकी यांना तीन मुले आहेत. जी तिन्ही मुले परासिया येथे एकत्र राहतात. मोठा मुलगा आदित्य हा चांदमेता येथील प्रादेशिक कार्यशाळेत काम करतो. आदित्य याचे दोन वर्षांपूर्वी इटारसी येथे राहणाऱ्या मोनिकासोबत लग्न झाले होते. मोनिका हिने 15 तारखेला आपले जीवन संपविले. त्यामुळे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदित्य वाल्मिकी याला अटक करण्यात आली आहे.
परासिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य वाल्मिकी याची पत्नी मोनिका हिने आपल्या घरी गळफास लावून घेतला. सकाळी बराच वेळ होऊनही मोनिका खोलीबाहेर आली नाही. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा कसा तरी उघडला. त्यावेळी त्यांना मोनिका ही खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. पण, तेथे डॉक्टरांनी मोनिकाला मृत घोषित केले.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी घराची तपासणी केली असता त्यांना तेथे सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी घराला सील ठोकले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुसाईड नोटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आमदार सोहनलाल वाल्मिकी यांचा मुलगा आदित्य वाल्मिकी याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
सुसाईड नोटवरून मृत पत्नी मोनिका हिचा आदित्य छळ करत असे. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले, अशी माहिती तपासादरम्यान मिळाली असे पोलिसांनी सांगितले. छिंदवाडा येथील डॉक्टरांच्या पथकाने मृताचे पोस्टमार्टम केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मृत मोनिका हिचे माहेर इटारसी येथे आहे. या घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. तिची आई हिने जावई आदित्य यानेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला. तसेच, मृत मोनिका हिच्या नातेवाईकांनीही आदित्य आणि त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.