MCD Election Result | दिल्लीचं तख्त कुणाला मिळणार? महापालिका निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू.. वाचा Updates!
2017 मध्ये भाजपासमोर आपचा पराभव झाला होता. यावेळी भाजपाचा दबदबा कायम राहतो की काँग्रेस आणि आपमुळे मतांवर मोठा परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणूक (Municipal corporation of Delhi) अर्थात MCD ची मतमोजणी (Vote counting) सुरु झाली आहे. 250 जागांसाठी 1,349 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला पुढच्या काही तासात होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सकाळी आठ वाजेपासूनच दिल्लीतील 42 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु झाली आहे. सर्व वॉर्डांमधील मतमोजणीच्या 5 ते 10 फेऱ्या होतील.
दुपारी बारा वाजेपर्यंत दिल्लीतील मतमोजणीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीचे सर्व अपडेट्स इथे पहा- क्लिक करा….
15 वर्षांपासून भाजपची सत्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजय मिळवला असला तरीही महापालिका निवडणुकांमध्ये अजूनही भाजपचा दबदबा कायम आहे. मागील 15 वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे.
या निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुकांसाठी झालेल्या 11 निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवलाय.
महत्त्वाचे 50 वॉर्ड..
दिल्लीच्या महापालिका निवडणुकांमध्ये 50 वॉर्डांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापालिकेत महत्त्वाची पदं भूषवलेले लोक यंदा आपापल्या वॉर्डांतून नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. तर दिल्ली सरकारमधील मंत्री आणि सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या वॉर्डांवरही सर्वांचं लक्ष आहे. दिल्लीचा तख्त राखण्यात कोण बाजी मारतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
पहिली निवडणूक कधी?
दिल्ली महापालिकेची पहिली निवडणूक 1958 मध्ये झाली होती. तेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. आम आदमी पार्टी यंदा दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. 2017 मध्ये भाजपासमोर आपचा पराभव झाला होता. यावेळी भाजपाचा दबदबा कायम राहतो की काँग्रेस आणि आपमुळे मतांवर मोठा परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळी 10वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार-
175 वॉर्डच्या मतमोजणीमध्ये भाजप 106 जागांवर आघाडीवर दिसून आली. आपचे 59 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले.