दूधाच्या टंचाईने किंमती वाढण्याची शक्यता, साल 2011 नंतर प्रथमच देशात दूधाची आयात होणार
चाऱ्याच्या किंमतीत वाढ झाल्याने दूधाचे भाव वाढले आहेत. चाऱ्याचे उत्पादन चार वर्षे स्थिर असले तरी डेअरी क्षेत्र मात्र दरवर्षी सहा टक्के वाढत आहे.
नवी दिल्ली : आपला देश भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. सुमारे 22 कोटी टन दूधाचे उत्पादन देशात होत असून जगाच्या तुलनेत 24 टक्के दूध उत्पादन आपल्या देशात होते. परंतू गेल्यावर्षी दूध देणाऱ्या गायी – म्हशींवर काळ बनून आलेल्या लम्पी रोगाने ही स्थिती एकदमच पालटली आहे. यंदा सरकारला अंदाजापेक्षा कमी दूधाचे उत्पादन होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा देशाला गरज पडल्यास दूग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
यंदा भारताच्या दूधाच्या उत्पादनाला ओहोटी लागण्याची शक्यता आहे. दूधाचे उत्पादन घटणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दूधाच्या कमतरतेमुळे दूधाच्या किंमतीत यावर्षी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. एका महत्वाच्या सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, दक्षिणेकडील राज्यात दूधाचा स्टॉकचा अंदाज घेतल्यानंतर जर गरज वाटली तर सरकार लोणी, तूप आदी दूग्धजन्य पदार्थांची आयात करू शकते.
देशात साल 2021 – 22 मध्ये 22.1 कोटी टन दूधाचे उत्पादन झाले आहे. त्या आधीच्या वर्षी देशात 20.8 कोटी टन दूधाचे उत्पादन झाले होते. साल 2021-22 मध्ये 6.25 टक्के जादा दूध उत्पादन झाले होते. पशुपालन आणि डेअरी सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की लम्पी त्वचेच्या आजाराने आर्थिक वर्ष 2022 – 23 मध्ये दूधाचे उत्पादनाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कोरोना साथीमुळे उलट दूधाची मागणी वाढली होती. या काळात दूधाच्या घरगुती मागणीत 8 ते 10 टक्के वाढ झाली आहे.
देशातील दूधाच्या पुरवठ्याबाबत काही अडचण नाही. स्किम्ड मिल्क पावडरचा ( एसएमपी ) भरपूर साठा आहे. परंतू डेअरी उत्पादनाची स्थिती नीट नाही. दुग्धजन्य पदार्थांची टंचाई जाणवू शकते. तुप, लोणी, पनीर आदी पदार्थांचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील राज्यातील दूधाच्या स्टॉकची पाहणी केल्यानंतर सरकार लोणी आणि तूपासारखे दुग्धजन्य डेअरीच्या पदार्थांच्या आयातीमध्ये हस्तक्षेप करेल. याकाळात आयात करणे तसे तोट्याचे होऊ शकते, कारण अलिकडील महिन्यात आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ झाली आहे.
लम्पी रोगाने 1.89 लाख गुरांचा मृत्यू
गेल्यावर्षी जनावारांना झालेल्या त्वचेच्या लम्पी आजाराने 1.89 लाख गुरांचा मृत्यू आणि कोरोना साथीत दूधाची मागणी वाढूनही देशाचे दूध उत्पादन स्थिर राहीले. दूभत्या जनावरांवर या आजाराचा प्रभाव इतका राहिला की एकूण उत्पादनात थोडा परीणाम झाला. सर्वसाधारण दूध उत्पादन दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढत होते. परंतू या वर्षी ते कमी होईल किंवा स्थिर राहील वा 1 ते 2 टक्के वाढेल असा अंदाज असल्याचे डेअरी सचिव राजेश कुमार सिंह यांनी म्हटले आहे.
म्हणून दूधाचे भाव वाढले
चाऱ्याच्या किंमतीत वाढ झाल्याने दूधाचे भाव वाढले आहेत. चाऱ्याचे उत्पादन चार वर्षे स्थिर असले तरी डेअरी क्षेत्र मात्र दरवर्षी सहा टक्के वाढत आहे. खाजगी आणि असंघटीत क्षेत्र वगळता दूधाचे सहकारी उत्पादन स्थिर राहील असा अंदाज आहे. सरकारने 2011 मध्ये शेवटची दूग्ध पदार्थांची आयात केली