अहमदाबाद : गुजरातचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करीत अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीतून आलेला मोठ्या प्रमाणावरील हेरॉईन (Heroin)चा साठा जप्त केला. या कारवाईत नऊ पाकिस्तानी नागरिकांसह 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तस्करांकडून तब्बल 280 कोटी रुपयांचे 56 किलो हेरॉईन जप्त (Seized) करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत गुजरातमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. तपास यंत्रणा धडक कारवाई करीत असतानाही तस्करांना चाप बसलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमली पदार्थ तस्करांच्या टोळीला लगाम घालण्यात का अपयश येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे पाकिस्तानी बोटीतून आलेल्या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला असतानाच बडोद्यातही मोठी कारवाई करण्यात आली. गुजरात पोलिसांनी बुधवारी केलेल्या या कारवाईत चार ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग उघडकीस आला. मध्य प्रदेशातून वडोदरा येथे मेफेड्रोन ड्रग्जची तस्करी केली जात होती. त्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 81 ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आहे. त्यासह आरोपींकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. बडोदा पोलिसांचे एसीपी जेबी गौर यांनी एएनआयला माहिती देत कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, “आम्ही मध्यप्रदेशातून बडोदा येथे मेफेड्रोन ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी 4 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 81 ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्स हस्तगत केले आहे. त्याचबरोबर एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.”
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पार्थ शर्मा, तनवीर हुसैन, शाहबाज पटेल हे बडोदा येथील रहिवासी आहेत. याशिवाय चौथ्या आरोपीचे नाव अनामिका असून ती महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहे. या सर्वांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचा नोंदणी क्रमांक असलेल्या कारमधून काही लोक बडोदा येथे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी बडोद्याच्या बाहेरील भागात कार थांबवली आणि त्यांच्या ताब्यातून 81.04 ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले. चौकशीदरम्यान आरोपींनी मध्य प्रदेशातील लालू नावाच्या पुरवठादाराकडून अमली पदार्थ आणल्याचे उघड झाले. (Millions of rupees worth of drug smuggling exposed in Gujarat; Pakistani boat seized from Arabian Sea)