Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात
सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द करताना त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या त्या आदेशाचे पालन करीत आशिष मिश्राने रविवारी दुपारी स्वत: सीजेएम न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे त्याची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा (Ashish Mishra) अखेर रविवारी पोलिसांकडे शरण आला. आशिष मिश्रा हा लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri violence) प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव कारखाली चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तो उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच तुरुंगातून बाहेर पडला होता. त्याच्या जामिनाला शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Ministers son Ashish Mishra jailed again in Lakhimpur Kheri violence case)
पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आशिषची तुरुंगात रवानगी
सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द करताना त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या त्या आदेशाचे पालन करीत आशिष मिश्राने रविवारी दुपारी स्वत: सीजेएम न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे त्याची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आशिष मिश्राला मागच्या दारातून तुरुंगात नेण्यात आले.
राजकीय वर्तुळातही उमटले होते पडसाद
ऑक्टोबर 2021 मध्ये लखीमपूर खेर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शेतकर्यांना भरधाव कारखाली चिरडल्याचा गंभीर आरोप आशिष मिश्रावर आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा असल्यामुळे या घटनेचे राजकीय क्षेत्रातही तीव्र पडसाद उमटले होते. आशिष मिश्रा याच्यावर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आशिष मिश्राला तुरुंगात जावे लागले. या प्रकरणात भाजपची कोंडी करून विरोधकांनी अजय मिश्रा यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती.
फेब्रुवारी 2022 मध्ये आशिष मिश्राला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाच्या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला आणि आशिष मिश्राचा जामीन रद्द करीत त्याला मोठा झटका दिला होता. उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, प्रत्येक पीडिताला प्रत्येक स्तरावर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. मात्र या प्रकरणात पीडित शेतकरी कुटुंबियांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही. त्यांचा सुनावणीचा अधिकार नाकारण्यात आला आहे, अशी परखड निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात निकाल देताना नोंदवली होती. त्या निकालाला अनुसरून आशिष मिश्राला पुन्हा तुरुंगाचा रास्ता धरावा लागला. त्यामुळे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मोठा झटका मानला जात आहे. (Ministers son Ashish Mishra jailed again in Lakhimpur Kheri violence case)
इतर बातम्या