मोदी सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी, ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी; ‘या’ मार्गांवर मात्र नो एंट्री !
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स देखील या समारंभात राष्ट्रपती भवनाचे संरक्षण करणार आहेत.
मोदी सरकार 3.0 चा शपथविधी आज होणार आहे. या साठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून, दिल्ली पोलिसांचे सुमारे 1100 वाहतूक कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स देखील समारंभात राष्ट्रपती भवनाचे संरक्षण करतील.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक पोलिस उपायुक्त (डीसीपी) प्रशांत गौतम यांनी सांगितले की, सुमारे 1100 वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना सर्व सूचनांची माहिती देण्यात आली आहे, आम्ही सर्व तालीम केली आहे. वाहतुकीच्या हालचालींबाबत सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी येणारे परदेशी प्रतिनिधी आणि राष्ट्राध्यक्षांसाठी कडेकोट सुरक्षा आणि योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून नियंत्रण क्षेत्रही तयार करण्यात आले आहे.
दुपारी 2 ते रात्री 11 पर्यंत येथील ट्रॅफिक राहील बंद
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी या रस्त्यांवरील वाहतूक दुपारी 2:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. फक्त पादचाऱ्यांनाच जाण्याची परवानगी असेल.
– संसद मार्ग (ट्रान्सपोर्ट भवन आणि टी-पॉईंट रफी अहमद किडवाल मार्ग यामधील रस्ता)
– नॉर्थ ॲव्हेन्यू रोड
– साउथ ॲव्हेन्यू रोड
– कुशक रोड
– राजाजी मार्ग – कृष्ण मेनन मार्ग
– तालकटोरा रोड
– पंडित पंत मार्ग
या मार्गांवर कोणत्याही वाहनाला ये-जा करण्यास किंवा थांबण्यास परवानगी दिली जाणार नाही
– इम्तियाज खान मार्ग
– रकाबगंज रोड
– रफी अहमद किडवई मार्ग
– पंडित पंत मार्ग
– तालकटोरा रोड
वर नमूद केलेल्या रस्त्यांवर कोणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून वाहन टो केले जाईल आणि कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. गोले पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या पंडित पंत मार्गावरील ट्रॅफिक पिटमध्ये ही टो केलेली वाहने पार्क करण्यात येतील. तसेच राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूच्या रस्त्यावर डीटीसी बसेस धावणार नाहीत..
दरम्यान आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे आज सकाळी राजघाटावर गेले. त्यानंतर ते ‘सदैव अटल’ स्मारक येथे गेले. व नंतर त्यांनी वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले