फळबागांसाठी सरकारची विशेष घोषणा, 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ 2 जिल्ह्यांचा समावेश
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने देशातील फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजनेची घोषणा केलीय.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने देशातील फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजनेची घोषणा केलीय. यानुसार 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून याचा 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा सरकारने केलाय. या योजनेचं नाव क्लस्टर विकास कार्यक्रम असं आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या फळबागांसाठी देशातील विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी क्लस्टर विकास कार्यक्रमाची घोषणा केलीय (Modi government starts cluster development program for farmers Nashik and Solapur included).
भारत फळबागांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातील एकूण फळभाज्यांच्या उत्पादनापैकी तब्बल 12 टक्के उत्पादन एकटा भारत करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या फळबागांच्या शेतीला सरकारच्या नव्या क्लस्टर विकास कार्यक्रमाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या क्लस्टर विकास कार्यक्रमात 53 क्लस्टर (गट) तयार करण्यात आलेत. यापैकी प्रायोगित टप्प्यावर 12 क्लस्टरची निवड करण्यात आलीय. यात देशातील काही राज्यांच्या निवडक जिल्ह्यांचा समावेश करुन तेथे विशिष्ट फळबागांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांचा समावेश
केंद्र सरकारच्या या क्लस्टर विकास कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश झालाय. नाशिक आणि सोलापूर अशी या दोन जिल्ह्यांची नावं आहेत. नाशिकला द्राक्ष बागांसाठी आणि सोलापूरला दाळिंब बागांसाठी निवडण्यात आलंय.
देशात कोणत्या राज्यात कोण्या फळबागांचा क्लस्टर?
जम्मू-काश्मीरच्या शोपियां आणि हिमाचलच्या किन्नौरची सफरचंदाच्या उत्पादनासाठी या क्लस्टर कार्यक्रमात निवड करण्यात आलीय. आंब्यासाठी उत्तर प्रदेशमधील लखनौ, गुजरातमधील कच्छ आणि तेलंगणातील महबूबनगरचा समावेश आहे. केळी उत्पादनासाठी आंध्र प्रदेशमधील अनंतपूर आणि तामिलनाडूतील थेनीला निवडण्यात आलंय. अननसासाठी त्रिपुरातील सिपाहीजालाची निवड झालीय.
दाळिंबासाठी महाराष्ट्रातील सोलापूर आणि कर्नाटकमधील चित्रदुर्गची निवड करण्यात आलीय. हळदीसाठी मेघालयच्या वेस्ट जयंतिया हिल्सची निवड झालीय. हा कार्यक्रम भौगोलिक वैशिष्ट्यांचा फायदा घेत फळबागांना एकत्र करणं आणि बाजारातील मागणीनुसार उत्पादनासाठी प्रोत्साहन तयार करण्यात आलाय.
हेही वाचा :
“दूध दर पाडणाऱ्या दूध कंपन्यांचे ऑडिट करून शेतकऱ्यांची लूट थांबवा”, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी
पंजाबमधील किसान सभेच्या शेतकऱ्यांची दुसरी तुकडी दिल्लीच्या सिंघु सीमेवर परतली!
6 महिने उलटूनही मागण्या मान्य नाही, शेतकऱ्यांचा देशभरात एल्गार, महाराष्ट्रातही पडसाद
व्हिडीओ पाहा :
Modi government starts cluster development program for farmers Nashik and Solapur included