सकाळी राजीनामा, संध्याकाळी पुन्हा शपथ, नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळावर भाजपची करडी नजर…
बिहारच्या राजकारणात जातीला खूप महत्त्व आहे. नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती केली. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि संध्याकाळी लगेच भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपचे राज्य प्रभारी विनोद तावडे यांची यात महत्वाची भूमिका राहिली आहे.
पटना | 28 जानेवारी 2024 : नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लालुप्रसाद यादव यांची साथ सोडून नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत घरोबा निर्माण केलाय. नितीशकुमार यांनी भाजपसोबत नाव घरोबा केला असला तरी त्यांच्या मंत्रीमंडळावर भाजपची करडी नजर असणार आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जातीय समीकरणे जुळवून आणली. त्याचप्रमाणे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातही जातीय समीकरणे जुळवून आणली आहेत.
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून 9 व्यांदा शपथ घेतली. याचवेळी दोन उपमुख्यमंत्री यांनीही शपथ घेतली. यासोबतच कुर्मी जातीतून दोन, भूमिहार जातीतून दोन, राजपूत एक आणि यादव जातीतून एक अशी मंत्री पदे देण्यात आली आहेत. याशिवाय मागास, अतिमागास आणि महादलित यांचा प्रत्येकी एक मंत्री करण्यात येत आहे.
बिहारच्या राजकारणात जातीला खूप महत्त्व आहे. नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती केली. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि संध्याकाळी लगेच भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपचे राज्य प्रभारी विनोद तावडे यांची यात महत्वाची भूमिका राहिली आहे.
नितीशकुमार यांची नव्या सरकारमध्ये जातीय समीकरण सोडवण्यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात आली. नितीश यांच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी निवडण्यात आलेल्या नावांची निवड ही जातीय समीकरण लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
नितीश कुर्मी समाजातील तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी कोरी
नितीश कुमार हे कुर्मी समाजातील आहेत. तर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे कोरी समाजातील आहेत. भूमिहार जातीतील विजय कुमार चौधरी, कहर जातीतील विजेंद्र यादव आणि प्रेम कुमार, कुर्मी समाजातील श्रवण कुमार, राजपूत समाजातील सुमित सिंग, तर संतोष सुमन हे महादलित समाजाचे आहेत. या सर्वांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
17 महिन्यांपूर्वीचे महाआघाडी सरकार संपले
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात 17 महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेले महाआघाडी सरकार कोसळले. नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी NDA विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. तिथेच त्यांची नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर नितीशकुमार पुन्हा राज्यपालांकडे पोहोचले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
इंडिया आघाडीला धक्का
नितीश कुमार यांनी संध्याकाळी 5 वाजता 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार जेडीयू आमदारांच्या बैठकीत म्हणाले की, आता एकत्र राहणे कठीण आहे आणि राजीनामा देण्याची वेळ आली आहे. नितीश कुमार यांचे हे पाऊल म्हणजे इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण नितीशकुमार यांनीच इंडिया आघाडीची मोठ बांधली होती. इंडिया आघाडीचे तेच शिल्पकार होते.