Anil Bonde : अनिल बोंडे भाजपाचे राज्यसभेतले प्रतोद, कोणत्या राज्यांची जबाबदारी? इतर प्रतोद कोण? वाचा सविस्तर…
यापूर्वीचे मुख्य प्रतोद शिवप्रताप शुक्ला यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये समाप्त झाली होती. त्यामुळे पक्षाने या नवीन नियुक्त्या केल्या आहेत.
नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची राज्यसभेत प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बोंडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांची राज्यसभेत व्हीप म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पक्षाच्या वतीने प्रतोद (Whip) म्हणून ही नियुक्ती केली आहे. राज्यसभेत भाजपा नेते म्हणून ज्येष्ठ मंत्री पीयूष गोयल यांची पक्षाने यापूर्वीच नियुक्ती केली आहे. तर खासदार अनिल बोंडे यांच्यावर महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी उत्तर प्रदेशचे खासदार डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांची तर त्यांच्यासह अन्य दहा खासदारांची नियुक्ती जाहीर केली आहे.
इतर राज्यातील प्रतोद कोण, यावर एक नजर टाकू या..
- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड – डॉ. अशोक वाजपेयी, डॉ. अनिल अग्रवाल, श्री. ब्रिजलाल.
- महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थान – डॉ. अनिल बोंडे.
- मध्यप्रदेश, छत्तीसगड – अजय प्रताप सिंह.
- ईशान्येतील राज्ये – कामाख्य प्रसाद तासा.
- बिहार, झारखंड – समीर ओरान
- हरयाणा, हिमाचल – इंदू बाला गोस्वामी
- दिल्ली, गुजरात – रमिलाबेन बारा
- आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, पांडिचेरी – जी. व्ही. एल. नरसिंहराव
…त्यामुळे नवीन नियुक्त्या
यापूर्वीचे मुख्य प्रतोद शिवप्रताप शुक्ला यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये समाप्त झाली होती. त्यामुळे पक्षाने या नवीन नियुक्त्या केल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी भाजपा प्रमुख असलेल्या लक्ष्मीकांत वाजपेयी यांना अलीकडे राज्यात कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यांना नुकतेच भाजपाने राज्यसभा खासदार केले. आता राज्यसभेच्या प्रतोदपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
आज दिल्ली येथे देशाचे संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह जी यांची भेट घेतली.@rajnathsingh pic.twitter.com/MdQ9w08w0W
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) July 21, 2022
राज्यसभा उमेदवारीवरून सस्पेन्स ते प्रतोदपद
भाजपाकडे राज्यसभेच्या तीन जागा गेल्या वेळी होत्या. त्यात पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे यांना संधी देण्यात आली होती. गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत होती. मात्र इतर दोन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा झाली होती. मात्र अनपेक्षितपणे विदर्भातील माजी कृषीमंत्री असलेल्या अनिल बोंडे यांना राज्यसभेत पाठवण्यात आले.