रामनाथ कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; ठाकरे गटाच्या खासदाराची जोरदार टीका
Arvind Sawant on Ramnath Kovind : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'वर बोलताना सावंत यांनी कोविंद यांच्यावर टीका केली आहे. सावंत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चधिकार समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत अहवाल सादर केला. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्विकारला आहे. देशव्यापी चर्चेनंतर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरण लागू केलं जाऊ शकतं. याला विरोधी पक्षांचा कडाडून विरोध आहे. काँग्रेसने या धोरणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटानेही ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाला विरोध केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या धोरणावर बोलताना रामनाथ कोविंद यांच्यावर टीका केली आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’वर प्रतिक्रिया
अरविंद सावंत यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या देशाच्या गरजा कार्य आहेत आणि प्राथमिकता काय आहेत? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका हरियाणा सोबत का घेतल्या? ज्यांना दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेता येत नाही. ते किती खोटे आणि दांभिक लोक आहेत, हे दिसतं. बिलमध्ये काय प्रावधान आहेत ते पहावं लागेल. हे सगळं अधांतरी आहे. देशाला विघटनाकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर हे निघाले आहेत. अधिवेशनात येईल तेव्हा हे बिल येईल आता गरजा काय आहेत ते पाहावं, असं अरविंद सावंत म्हणाले.
रामनाथ कोविंद यांच्यावर टीका
देशातील इश्यू बाजूला करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रादेशिक पक्ष भाजपला नकोच आहेत ना… त्यांचा हा जुना विषय आहे. राज्याला विचारलं जाणार नाही म्हणजे ही तर हुकूमशाही झाली. कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील एक पोपट आहेत. ते आता राष्ट्रपती नाहीत. हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत ते बघा…, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या जिभेला चटका दिला गेला पाहिजे, असं विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अजून ‘बोंड’ आहे… त्याचं फुल झाल्यावर बोलू… अनिल बोंडे भाजपच्या विषारी खतावर तयार झालेलं बोंड आहे, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी अनिल बोंडेंच्या विधानावर निशाणा साधला आहे.