मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडाला चिकटपट्टी लावून का गप्प बसले?; संजय राऊत यांनी कशाबद्दल केला सवाल?
शंभुराजे देसाईंची राजकीय कारकिर्द शिवसेनेत सुरू झाली. ते मंत्री आमदार झाले. विनायक राऊत जबाबदार नेते आहेत. त्यांनी एक माहिती दिली आहे. त्या अर्थी ते जबाबदारीने बोलत आहेत, असं राऊत म्हणाले.
नवी दिल्ली : मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल. भाजपचा महापौर बसेल अशी घोषणा भाजपने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच भाजपचे राष्ट्रीय नेते जेपी नड्डा यांच्यापासून भाजपचे अनेक नेते वारंवार तसे सुतोवाच करत आहे. मात्र, त्याला शिंदे गटाने आक्षेप घेतलेला नाही. वर्षानुवर्ष शिवसेनेचा महापौर महापालिकेत असताना भाजपने महापौर पदावर आमचाच माणूस बसणार असल्याचं जाहीर केल्याने शिंदे गटावर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. तुम्ही स्वत:ला शिवसेना समजता तर महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल हे कसे ऐकून घेता? असा सवालच ठाकरे गटाने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? असा सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका का घेत नाही? भाजपची का फटते? निवडणुका घ्या. दूध का दूध पानी का पानी होईल. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असं भाजप म्हणत असेल तर शिवसेना म्हणवणारे लोक आहेत ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? भाजपचा झेंडा मराठी माणसाचा नाही. तो व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा आहे. ज्यांना मुंबई वेगळी करायची आहे, अशा विचाराच्या लोकांचा झेंडा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा फुटलेला गट गप्प का आहे? त्यांनी या मुद्द्यावर उत्तर द्यावं. आम्ही म्हणतो शिवसेनेचा झेंडा फडकेल. तुम्ही गप्प का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मोदी बोलत का नाही?
राहुल गांधी परदेशात गेले. त्यांनी अमेरिकेतही पत्रकार परिषद घेतली. या देशातील पत्रकारांशी प्रत्येक नेता बोलतो. पण देशाचे पंतप्रधान देशातील मनातल्या प्रश्नांना उत्तरे देत नाही. ते मन की बात बोलतात. पण देशाची मन की बात बोलत नाहीत. ते स्वत:शीच बोलत असतात. लोकांच्या मनात काय आहे हे स्वतंत्र वृत्तीचा मीडिया विचारत असतो.
दहशतवाद कमी केला मग मणिपूरला काय सुरू आहे? अर्थव्यवस्था मजबूत आहे. मग दोन वेळा नोटबंदी का फसली? डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य का कमी झाले. देशाची अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात दिल्याने किती नुकसान झालं? एलआयसी, एअर इंडिया कुणासाठी विकत आहात? अनेक गोष्टी बाहेर येतील. पंतप्रधानांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
त्यांचा पाय घसरला
जयवंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. पण हे विधान राऊतांनी केलं तर टीनपाट प्रवक्ते फुत्कार सोडतील. पण जयंतराव तेच सांगत आहेत. मिंधे गटाच्या आमदार, खासदारांना भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल अशी माहिती आहे. एकमेकांचा संपर्क कायम सुरू असतो. त्यांचे दु:ख आम्हाला माहीत आहे. जाहीर सांगणं बरोबर नाही. त्यांचा पाय घसरला आहे. त्यांचं त्यांनीच निस्तरलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
कसलं प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष?
सुषमा अंधारे यांचा अवमान केल्याप्रकरणी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार त्यांचं आहे. गृहखातं त्यांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारे प्रकरणावर बोललं पाहिजे. जंतरमंतरवर प्रत्यक्ष मुली समोर आहेत. तरीही त्यांची तक्रार दाखल केली जात नाही. कसलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष? कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे. कायद्यावर कोणी तरी मालकी हक्क सांगत आहे. आम्ही लिहू तोच एफआयआर. आम्ही सांगतो तेच गुन्हा असं सांगितलं जात आहे. पण ते औटघटकेचं राहणार आहे. सुषमा अंधारे सुशिक्षित आहेत. त्यांचं प्रकरण गंभीरपणे घेतले जात नाही, अशी टीका त्यांनी केली.