Video : संसदेत अविश्वास प्रस्तावावेळी खासदार श्रीकांत शिंदे बोलू लागले हनुमान चालिसा, पण का ते जाणून घ्या
संसदेत अविश्वास प्रस्तावाविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी विरोधकांवर जहरी टीका केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर थेट हनुमान चालिसा म्हणत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होत आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरचा मुद्दा उचलून धरला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पण तसं काही होताना दिसत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सरकारच्या बाजूने आपलं म्हणणं मांडलं. अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसेचा मुद्दा उचलला. तसेच आपली बाजू मांडत असताना त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली.
काय म्हणू लागले हनुमान चालिसा?
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यावरही बंदी घालण्यात आली होती?” यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी हनुमान चालिसा म्हणता येते का? असा प्रश्न विचारला. मग काय क्षणाचाही विलंब न करता श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, “मला पूर्ण हनुमान चालिसा म्हणता येते.” यानंतर त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली.
हनुमान चालिसा म्हणत असताना त्यांना स्पीकर राजेंद्र अग्रवाल यांनी थांबवलं आणि आपलं म्हणणं पुढे करण्यास सांगितलं. तसेच विरोधकांना गप्प बसण्याची सूचना केली. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपलं म्हणणं पुढे मांडण्यास सुरुवात केली. “आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर पुढे जाणारे लोकं आहोत. आम्ही फक्त हिंदुत्व बोलत नाही तर त्यानुसार चालतोही. हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला तर थेट तुरुंगात टाकलं. देशद्रोहाचा खटला चालवला.”
“सावरकरांच्या विचारावर आमचा शिवसेना पक्ष स्थापन झाला होता. बाळासाहेबसुद्धा सावरकर यांना मानत होते. पण काही जण सावरकरांना शिव्या देण्याऱ्या लोकांच्यासोबत बसले आहेत. हे आहे यांची INDIA. पत्रकारांना तुरुंगात टाकण्याचं कामही यांनी केलं आणि लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत.”, असंही श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. हाच मुद्दा आता शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उचलला.