नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपची नवी रणनिती; पक्षाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवा उपक्रम
BJP New Activity for PM Narendra Modi Birthday : भाजपचं काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पक्षाने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून मोदी सरकारच्या काळातील योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतील. तसंच भाजपच्या कामाबद्दलही लोकांना सांगितलं जाईल. वाचा काय आहे 'नमो 11'
विनायक डावरुंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : भाजप आणि मोदी सरकारचं काम घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘नमो 11’ असं या उपक्रमाचं नाव आहे. मोदी सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो 11’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. भाजपचं काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कामगार वर्गाची मतं मिळवण्यासाठी भाजपने हा नवा उपक्रम आणला आहे. मुंबई उपनगरात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा करणार उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. उद्या या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
‘नमो 11’ उपक्रमाचा उद्या शुभारंभ
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात भाजपने नवा उपक्रम हाती घेतला आहे. भाजपचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘नमो 11’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत या नव्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 वा वाढदिवस असतो. नुकतंच त्यांनी 73 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त भाजपने नवा उपक्रम हाती घेतला आहे. ‘नमो 11’ च्या माध्यमातून जनतेशी संपर्कात राहण्यासाठी भाजपने कार्यक्रम हाती घेतला आहे.
‘नमो 11’ मध्ये कोणते उपक्रम राबवले जातील?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत ‘नमो 11’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यात मुंबई उपनगरं आणि जिल्हात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा विकास, शाश्वत विकास या सारख्या 11 विषयांशी संबंधित लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.
मुंबई उपनगरात कुर्ला, चांदिवली, अंधेरी (पश्चिम), वांद्रे (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), वांद्रे (पूर्व), मागाठाणे, मुलुंड, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या ठिकाणी ‘नमो 11’ अंतर्गत उपक्रमांचा उद्या शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये महिला, बांधकाम कामगार, मश्चिमार, महिला बचत गट, दिव्यांग, खेळाडू, आदिवासी अशा विविध घटकांसाठीही उपयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहेत.