‘पत्नीला कॅन्सर झालाय..तिची काळजी घ्यायची आहे, कृपया जामीन द्या….,’ बड्या उद्योगपतीचे कोर्टाला साकडे, कोर्टाने अखेर…
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ईडीच्या विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांना जामीन देण्यास मनाई केली होती. परंतू त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार करण्याची सूट दिली होती.
जेट एअरवेजचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती नरेश गोयल यांना मनी लॉड्रींग प्रकरणात कोर्टाने अखेर दोन महिन्यांचा अंतरिम जामीन वैद्यकीय कारणाखाली दिला आहे. ई़डी कोर्टाने हा जामीन देताना त्यांना मुंबई बाहेर जाण्यास मात्र मनाई केली आहे. सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. नरेश गोयल स्वत: कॅन्सर सारखा दुर्धर आजाराने उपचार घेत असून त्यांची पत्नीही कॅन्सर पिडीत असल्याने त्यांनी वैद्यकीय कारणाखाली जामिन मागितला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कॅनरा बॅंकेशी संबंधित मनी लॉड्रींग अॅक्ट प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांच्या एकल पीठाने हा जामीन दिला आहे. जामीनासोबत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर नरेश गोयल यांना हा दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यात विशेष न्यायालयाने गोयल यांना जामीन मंजूर करण्यास मनाई केली होती. परंतू त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार करण्याची सूट दिली होती. गेल्या महिन्यात 10 एप्रिल रोजी विशेष न्यायालयाने वैद्यकीय कारणाखाली त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. परंतू नरेश गोयल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणात गेल्या आठवड्यात शुक्रवारी देखील सुनावणी झाली होती. त्यात मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 6 मे रोजी ठेवली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायमूर्ती जमादार यांनी सर्व अटीचे पालन करण्याच्या अटीवर नरेश गोयल यांना सशर्त जामीन मंजूर करीत असल्याचे म्हटले आहे. या अटीवर त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर झाला आहे. विशेष न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये आणि गोयल यांनी आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा अशा अटींवर हा जामिन दिला आहे.
पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
उद्योजक नरेश गोयल यांनी वैद्यकीय कारणासाठी आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी केली होती. त्यांची पत्नी अनिता गोयल आणि त्यांना स्वत:ला कॅन्सर झाल्याचे त्यांनी कोर्टास सांगितले. नरेश गोयल यांच्यावतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. नरेश गोयल यांच्या विरोधातील आरोप जरी गंभीर असले तरी त्यांना जामीन वैद्यकीय तसेच मानवीय आधारे मिळाला पाहीजे. गोयल यांची पत्नी अनिता या कॅन्सरने पीडीत असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या काही महिन्यांच्या सोबती असणार आहेत असे निदान केले आहे. त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी संधी मिळावी यासाठी आपल्या अशिलाला जामीन मिळावा अशी मागणी वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला केली.
538 कोटींच्या घोटाळ्यात अटक
नरेश गोयल यांच्या जामीनास ईडीच्या वकीलांनी विरोध केला होता. परंतू त्यांच्या रुग्णालयातील वास्तव्याला मुदतवाढ देण्यास मात्र ईडीच्या वकीलांनी विरोध केला नाही. नरेश गोयल 74 वर्षांचे असून त्यांना डिसेंबर 2023 मध्ये ईडी सक्तवसुली संचनालयाने अटक केली होती. जेट एअरवेजचे संस्थापक असलेल्या नरेश गोयल यांनी कॅनरा बॅंकने जेट एअरवेजला दिलेल्या 538.62 कोटी रुपयांच्या कर्जात हेराफेरी केल्याने त्यांच्यावर मनी लॉड्रींग केस दाखल झाली होती.