अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुरलीधर मोहोळांचं उत्तर; म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर…
Murlidhar Mohol on Budget 2024 and Mahavikas Aghadi : मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. विरोधकांकडून अर्थसंकल्पावर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात काहीही तरतूद नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. याला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीची माहिती दिली जात आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत. तसंच अर्थसंकल्पातील महत्वाच्या बाबींवर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं आहे. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
विरोधकांना उत्तर
महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य पहिली. बजेट मांडताना दोन राज्याच्या नावांचा उल्लेख झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण याचा अर्थ असा नाही की, केवळ हे बजेट 2 राज्याचं आहे… खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. रेल्वेची महाराष्ट्रसाठी साडे पंधरा हजार कोटींची तरतूद आहे. नवे मार्ग देखील होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीची माहिती दिली जाते, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
पुण्यासाठी अर्थसंकल्पात काय?
पुणे शहरासाठी केलेल्या तरतुदीबद्दल मोदींचे मनापासूने आभार… पुणे मेट्रोसाठी 815 कोटींची तरतूद केली आहे. मुळा-मुठा नदीसाठी 690 कोटी तरतूद केलीय. पुणे हे 30 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे. पुणे रेल्वेमधील 4 मार्गांचा समावेश झाल्याचं बजेटमधून दिसून येत आहे. राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न बजेटमधून झाला आहे, असंही मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
आजचा अर्थसंकल्प मोदींचा संकल्प आहे. विकासाकडे वेगाने पाऊल टाकणारा आहे. विकासाभिमुख हा अर्थसंकल्प आहे. सहकार खातं, नागरी उड्डाण, महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात चांगली तरतूद करण्यात आली आहे. 100 शहरात इंडस्ट्रियल पार्क केले जाणार आहेत. सर्वसामान्य माणसाचा विकास होईल असा अर्थसंकल्प आहे. सहकार आणि कृषी क्षेत्रासाठी दीड लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशात 20-25 विमानतळ येत्या काळात होतील. सर्वसामान्य माणसाचा विकास झाल्याचं दिसत आहे, असंही मोहोळ म्हणालेत.