नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील एका मोठ्या मुस्लिम नेत्याने मुस्लिम समाजातील IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या महिलांबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. करीमगंज येथे एका राजकीय सभेला ते संबोधित करत होते. मुस्लिम समाजातील IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या महिलांनी हिजाब घातला पाहिजे. मुस्लिम महिलांना हिजाब घालणं किंवा स्वत:चे केस झाकता येत नसतील, तर त्या मुस्लिम आहेत, हे कसं समजेल?. AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल यांनी हे वक्तव्य केलय. AIUDF हा आसाममधील एक राजकीय पक्ष आहे. बदरुद्दीन अजमल हे ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख आहेत.
“बाहेरच्या भागात मी बघितलय, मुली जेव्हा शिक्षणासाठी जातात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर हिजाब असतो. त्यांच डोकं खाली आणि डोळे खाली असतात. पण तेच आसामबद्दल बोलायच झाल्यास मुलींनी हिजाबमध्ये राहण आवश्यक आहे. डोक्यावरचे केस लपवण, हिजाब घालण हे आपल्या धर्मात आहे” असं AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल म्हणाले.
‘मुलींचे केस हे सैतानाची रशी’
“मुलींचे केस हे सैतानाची रशी आहेत. मुलींचा मेकअप सैतानाची रशी आहे. त्यामुळे बाजारात जाण्याआधी त्यांचा चेहरा झाकलेला हवा, नजर खाली हवी. सायन्स विषय घेऊन शिका, डॉक्टर, आयएएस, आयपीएस व्हा. तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाहीत, तर मुस्लिम महिला आयपीएस, डॉक्टर आहेत, हे कसं समजणार?” असं बदरुद्दीन अजमल म्हणाले.
मुस्लिमांबद्दल याआधी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य
बदरुद्दीन अजमल हे याआधी सुद्धा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. “मुस्लिम चोरी, दरोडा, रेप आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांमध्ये नंबर 1 आहेत. आपण तुरुंगात जाण्यातही नंबर 1 आहोत” असं ते म्हणाले होते.