PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही, PM मोदी पाळणार कोणते वचन
एकाच नाण्याची दोन बाजू असलेले उद्धव ठाकरे गट आणि भाजप राज्याच्या राजकारणात दुरावले. त्यांनी विरोधाचे सूर आळवले. गेल्या दोन वर्षांत दोघेही एकमेकांवर तुटून पडल्याचे चित्र रोजचेच आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्या विरोधात बोलणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना आणि भाजप हे कित्येक वर्षांचे जणू राज्यातील समीकरणं. पण 2014 पासून युतीमध्ये तणाव वाढत गेला. युती तुटली, शिवसेना उभी फुटली. या पक्षाची दोन शकलं झाली. शिंदे गट भाजपसोबत गेला. तर उद्धव ठाकरे गट हा विरोधी खेम्यात आहे. उद्धव ठाकरे गोटातून रोज भाजपविरोधात दारुगोळा डागण्यात येतो. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर भाजपवरील हल्ले तीव्र झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधानांनी ही भूमिक जाहीर केली.
मला शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही
“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं कारण पंतप्रधानांनी दिलं. त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन”, असं मोदी म्हणाले.
ते माझं शत्रू नाहीत
दोन गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल”, अशी भावनिक साद त्यांनी घातली.