चंद्रावर जेथे रशियाचं लूना-25 कोसळलं ती जागा NASA ने शोधली, लूनाने चंद्रावर नवीन खड्डा तयार केला
भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट रोजी यशस्वी लॅंडींग झाले. याआधी रशियाचं लूना-25 देखील दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार होते.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग केले, परंतू त्याच वेळी रशियाच्या लूना-25 या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींगचा प्रयत्न केला होता. परंतू आपल्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींगचा रशियाचा प्रयत्न विफल झाला आणि त्यांचे याने चंद्रावर क्रॅश झाले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अखेर रशियाचं लूना-25 जेथे कोसळलं ती जागा शोधून काढली आहे. लूना-25 कोसळल्याने त्या जागी खड्डा पडला आहे. रशियाचे लूना-25 भारताच्या आधी 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड होणार होते, परंतू प्री लॅंडींग ऑर्बिटमध्ये जाताना त्याचा ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. नंतर कळले की स्पेसक्राफ्ट नियंत्रणाबाहेर जाऊन चंद्राच्या पृष्ठभागावरच क्रॅश झाले.
भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 चंद्रावर 23 ऑगस्ट रोजी यशस्वी लॅंडींग झाले. याआधी रशियाचं लूना-25 देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार होते. परंतू रशियाचं लूना-25 यान 19 ऑगस्ट रोजी चंद्रावर कोसळलं. आता नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर ( LRO ) या स्पेसक्राफ्टने चंद्रावर नवीन क्रेटर शोधून काढला आहे. या क्रेटर रशियाच्या लूना – 25 कोसळल्याने तयार झाला असावा असे म्हटले जात आहे. नासाने म्हटले आहे की रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने 21 ऑगस्ट रोजी इम्पॅक्ट पॉइंटची अंदाजित जागा जाहीर केली होती.
नासाच्या एलआरओसी टीमने एलआरओ यानाच्या मदतीने त्या जागेचे फोटो काढले होते. फोटो काढण्याची प्रक्रीया 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.15 वाजता थांबवली. एलआरओसी टीमने लॅंडींग आधी काढलेले फोटो आणि नंतर काढलेले फोटोची तुलना केली असता एक छोटा नवीन खड्डा तयार झाल्याचे निदर्शनास आले. एलआरओने याच जागेचा फोटो जून 2022 मध्ये काढला होता. हा नवा खड्डा लूना-25 च्या अंदाजित इम्पॅक्ट बिंदुजवळ आहे. त्यामुळे एलआरओ टीमने हा निष्कर्ष काढला की हा नैसर्गिक खड्डा नसून लूना-25 मुळे झालेला खड्डा आहे. नवीन खड्डा दहा मीटर व्यासाचा आहे. हा लूना-25 लॅंडींग साइटपासून 400 किमी दूर आहे.
50 वर्षांनंतर रशियाचे चंद्रयान
रशियाचे लूना-25 हे साल 1976 नंतर पाठविले चंद्रयान होते. रशियाने 10 ऑगस्ट रोजी लूना-25 यान लॉंच केले होते. रशियाला भारताच्या आधी 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवायचे होते. परंतू ते प्री लॅंडींग ऑर्बिटमध्ये स्थापित करताना नियंत्रणा बाहेर गेले. रशियाच्या अंतराळ संस्थेने सांगितले की थ्रस्टर इंजिन जास्त वेळ चालू राहिल्याने ते सरळ चंद्राच्या दिशेने गेल्याने क्रॅश लॅंडींग झाले.