जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त; आंदोलनाच्या परिसरात कलम 144 लागू

| Updated on: May 04, 2023 | 12:23 PM

Brijbhushan Sharan Singh : बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; नेमकं काय होणार?

जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त; आंदोलनाच्या परिसरात कलम 144 लागू
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात नवी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं जातंय. देशातील नावाजलेल्या पैलवालांनी हे आंदोलन छेडलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक केली जावी, यासाठी हे पैलवान मागणी करत आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही आमची पदकं परत करू, अशी भूमिका या पैलवानांनी घेतली आहे. कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमची पदकं परत करू, या आंदोलनात सहभागी झालेल्या विनेश फोगाटने असं मत मांडलं आहे.

जंतर मंतरवरील परिस्थिती काय?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलन सुरु आहे.हा जंतर-मंतर परिसर सध्या निर्मनुष्य करण्यात आला आहे. जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेटिंग करून पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले आहेत.माध्यमांच्या ओबी व्हन्स आणि गाड्याही एक किलोमीटर लांब हलवल्या आहेत. आंदोलन परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काल मध्यरात्रीच्या राड्यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 3 मे ला पहिलवानांच्या वतीने बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात कागदपत्र सादर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिटर जनरल तुषार महेता यांनी कागदपत्र सादर करण्यास विरोध केला होता. प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत त्यांच्याकडे कागदपत्र सपुर्त करावे अशी विनंती न्यायालयाला केली होती.

हे प्रकरण महिला अत्याचाराचं असल्यामुळे त्यामु़ळे कागदपत्र बंद लिफाफ्यात सादर करत आहोत, असं पहिलवानांच्या वतीने सांगण्यात आलं. यावर न्यायालयाने कागदपत्र स्विकारण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे

दुसरीकडे जंतर मंतरवर पैलवानांचं आंदोलन सुरू आहे. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला पैलवानांचं गेल्या 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतर मंतर वर आंदोलन सुरू आहे.बृजभूषण शरण सिंह यांना अटक करावी या मागणीसाठी महिला पहिलवानांचं आंदोलन सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरातील पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा 6 महिला पैलवानांचं शोषण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात अद्यापपर्यंत ब्रृजभूषण शरणसिंह यांना अटक करण्यात आलेली नाही.