शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; नार्वेकर नवं वेळापत्रक मांडणार?
Shivsena NCP MLA Disqualification Case Hearing in Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होत आहे. आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?, याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 30 ऑक्टोबर 2023 : राज्याच्या राजकीय वर्तुळासह महाराष्ट्राचं लक्ष राजधानीकडे आहे. आज राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत आज एकत्रित सुनावणी सुनावणी होणार आहे. मागच्या वेळी 17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेबाबत सुनावणी झाली. त्यानंतर आजची सुनावणी होणार आहे. आजच्या न्यायालयीन कामकाजात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा समावेश आहे. सकाळी 11 वाजेनंतर सुनावणीची शक्यता आहे.
राहुल नार्वेकर नवं वेळापत्रक सादर करणार?
शिवसेना आमदार अपात्रतेचा चेंडू आता सिधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात पाहणं महत्वाचं असेल. मागच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले होते.शिवसेनेच्या आमदार अपात्रेबाबत सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्यासाठी आज शेवटची संधी असल्याचं न्यायलयाने म्हटलं होतं. त्यामुळे राहुल नार्वेकर हे वेळापत्रक आज सादर करणार का? हे पाहणंही महत्वाचं असेल. या सुनावणी आधी राहुल नार्वेकर हे काल दिल्लीला गेले होते. महाधिवक्ता तुषार मेहता यांची राहुल नार्वेवर यांनी भेट घेतली. त्यानंतर आता आजच्या सुनावणीत नार्वेकर नवं वेळापत्रक मांडणार का हे पाहणंही महत्वाचं असेल.
आजच्या सुनावणी वेळी खासदार सुप्रिया सुळे सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. मागच्या 17 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळीही सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
आधीच्या सुनावणीत काय झालं?
याआधी 17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हीदेखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित सुनावणी होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं होतं. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल. तेव्हा सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असेल. हवं तर दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून सुनावणीचं वेळापत्रक ठरवा. पण ते पुढच्या सुनावणीला मांडाच, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. त्यानंतर आता आज सुनावणी होणार आहे.