दादा बारामतीत सायकलवर फिरायचे, माणसाने इतकं कृतघ्न असू नये; राऊतांनी अजित पवारांना आरसा दाखवला
Sanjay Raut on Ajit Pawar Statement About Sharad Pawar : शिंदे गटाच्या एका खासदाराचा व्हीडिओ लवकरच समोर येणार, वेट अँड वॉच!, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी शाब्दिक हल्ला केला आहे. वाचा सविस्तर...
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 05 जानेवारी 2024 : अजित पवार इतके निर्दयी होतील, असं मला वाटल नव्हतं… ज्या शरद पवारसाहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं. आपल्याला वाढवलं. प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्याच बाबत तुम्ही अशी वक्तव्य करणं योग्य नाही. या नव्या कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांच्या भूमिकेत गेलेला आहात. त्यांना मी वाघाची भूमिका म्हणणारच नाही. कारण वाघाला काळीज असतं. शरद पवारांशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण तुम्ही आज जे काही आहात. तुम्ही जे सुखाचे चार घास खात आहात. ते पवारांमुळे…, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे.
माणसाने कृतघ्न असू नये- राऊत
शरद पवारांनी एवढं मोठं सम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? अजित पवार तु्म्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. आज तुम्ही जे आहात ते शरद पवारांमुळे… पण माणसाने इतकं कृतघ्न असू नये, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. माझी शेवटची निवडणूक म्हणून काही लोक बारामतीकरांना आवाहन करतील. पण खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी होईल हे माहिती नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांवर महाविकास आघाडीतून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे गटाच्या खासदाराचा ‘तो’ व्हीडिओ
माझ्याकडे शिंदे गटाच्या खासदारांचा एक व्हिडिओ आला आहे. हे खासदार परदेशात कशासाठी जातात, हे सांगणारा हा व्हीडिओ आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचं चरित्र लवकरच समोर येईल. सगळं बाहेर येणार… Wait and Watch!, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळ संजय राऊत आता कोणता व्हीडिओ समोर आणणार हे पाहणं महत्वाचं असेल.