जीवघेणा रस्ते-रेल्वे प्रवास! अपघाती बळींचा आकडा मोठा धक्का देणारा; एनसीआरबीच्या अहवालातून भयावह आकडेवारी समोर
वाहतूक अपघातांचा आकडा थेट 2021 मध्ये 4,22,659 पर्यंत वाढला आहे. या वाहतूक अपघातांमध्ये 4,03,116 रस्ते अपघात, 17,993 रेल्वे अपघात आणि 1,550 रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच रस्ते आणि रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांतील बळी आणि जखमींची भयावह आकडेवारी उजेडात आली आहे. 2021 मध्ये संपूर्ण वर्षभरात देशभरात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये तब्बल पावणेदोन लाखांच्या घरात मृत्यू (Death) झाले. देशात सुमारे 4.22 लाख वाहतूक अपघात (Accident) झाले व त्यात 1.73 लाख लोकांना जीव गमावला. एनसीआरबी (NCRB)च्या अहवालातून भयावह आकडेवारी समोर आली आहे.
एनसीआरबीचा अहवाल
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 24,711 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापाठोपाठ तामिळनाडूचा क्रमांक लागला आहे. येथे 16,685 अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार ही चक्रावून टाकणारी भयावह आकडेवारी समोर आली आहे. 2020 च्या तुलनेत रस्ते आणि रेल्वे मार्गावरील अपघात वाढले आहेत, असा निष्कर्षही एनसीआरबीच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे.
रस्ते अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
देशभरात 2020 मध्ये 3,68,828 इतकी रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद झाली होती. हे प्रमाण वर्षभरात कैक पटीने वाढले आणि वाहतूक अपघातांचा आकडा थेट 2021 मध्ये 4,22,659 पर्यंत वाढला आहे. या वाहतूक अपघातांमध्ये 4,03,116 रस्ते अपघात, 17,993 रेल्वे अपघात आणि 1,550 रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश आहे. त्यात अनुक्रमे 1,55,622 मृत्यू, 16,431 मृत्यू आणि 1,807 मृत्यू अशी मनुष्यहानी झाल्याचे एनसीआरबीने म्हटले आहे.
2020 ते 2021 मध्ये सर्वाधिक वाढ तामिळनाडूमध्ये
2020 ते 2021 या कालावधीत राज्यांमधील वाहतूक अपघाताच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ तामिळनाडूमध्ये (46,443 वरून 57,090) नोंद झाली. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश (43,360 वरून 49,493), उत्तर प्रदेश (30,593 वरून 36,508), महाराष्ट्र (49,508 वरून 30,086 पर्यंत) आणि केरळ (27,998 ते 33,051 पर्यंत) अशा प्रकारे अपघातांची नोंद झाली आहे.
वाहतूक अपघातांतील बळींच्या आकडेवारीत महाराष्ट्र तिसरा
वाहतूक अपघातांमुळे 2021 मध्ये वर्षभरात तब्बल 3,73,884 लोक जखमी झाले. तसेच विविध अपघातांमध्ये 1,73,860 लोकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 24,711 मृत्यूची नोंद झाली. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 16,685 मृत्यू आणि तिसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात 16,446 लोकांचा वाहतूक अपघातांमध्ये मृत्यू झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे. या तीन राज्यांमध्ये देशभरातील वाहतूक अपघातांमधील एकूण मृत्यूच्या तुलनेत अनुक्रमे 14.2 टक्के, 9.6 टक्के आणि 9.5 टक्के इतक्या मृत्यूची नोंद झाली.
2021 मध्ये एकूण मृत्यूंपैकी 33.3 टक्के मृत्यू तीन राज्यांमध्ये
2021 मध्ये देश पातळीवर नोंदवलेल्या एकूण मृत्यूंपैकी 33.3 टक्के (1,73,860 पैकी 57,842) मृत्यू तीन राज्यांमध्ये झाल्याचेही एनसीआरबीने नमूद केले आहे. 2017 ते 2019 या कालावधीत वाहतूक अपघातांमधील एकूण मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ दिसून आली होती. 2020 मध्ये त्यात मोठी घट झाली होती. मात्र 2021 मध्ये पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
2020 च्या तुलनेत 2021 मध्ये अपघातात 18.8 टक्क्यांनी वाढ
2020 च्या तुलनेत 2021 मध्ये एकूण अपघाती मृत्यूंची संख्या 18.8 टक्क्यांनी (1,46,354 वरून 1,73,860) वाढली आहे. 2021 मध्ये एकूण 4,03,116 रस्ते अपघात झाले. देशातील रस्ते अपघात 2020 मध्ये 3,54,796 वरून 2021 मध्ये 4,03,116 पर्यंत वाढले आहेत.