NEET-UG 2024 : या एका प्रश्नाने पु्न्हा घातला घोळ; 13 लाख विद्यार्थ्यांची बदलणार पुन्हा रॅकिंग
Supreme Court : नीट युजी पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेर परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट केले. आता 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात यामुळे फेरबदल होईल. या एका प्रश्नावरुन हे महाभारत सुरु झाले आहे. कोणता आहे हा प्रश्न?
NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला. त्यातच आता याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. फेर परीक्षा होणार नाही, हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एनटीएने न्यायालयासमोर डेटा ठेवला होता. त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल दोन दिवसात जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी 4 जून रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर 1 जुलै रोजी एनटीएने सुधारीत निकाल जाहीर केला होता.
13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात बदल
सर्वोच्च न्यायालयात निकालात स्पष्ट केले आहे की या निर्णयामुळे 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात फेरबदल होईल. एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे गृहीत धरल्याने हा प्रकार समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांनी एकाच प्रश्नाला दोन पर्याय देण्याच्या एनटीएच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान दिले होते. विद्यार्थ्यांची नाराजी लक्षात घेत न्यायालयाने योग्य पर्याय, योग्य उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
IIT दिल्लीने दिला अहवाल
या प्रश्नावर IIT दिल्लीतील तज्ज्ञांनी न्यायालयात उत्तर दाखल केले. त्यानुसार या प्रश्नाचे एकच उत्तर योग्य होते. दोन नाही. ‘अणू विद्युतीयदृष्ट्या तटस्थ असतात. कारण त्यांच्याकडे धन आणि ऋण समान रुपाने भारीत होतात’, हे उत्तर बरोबर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
तर ‘प्रत्येक मुलद्रव्याचे अणू स्थिर असतात आणि ते त्याचे खास वर्णपट उत्सर्जित करतात’ हा दुसरा पर्याय होता. यापूर्वी NTA ने दोन पर्यायांपैकी कोणत्याही एकाची निवड करणाऱ्यांना 4 गुण देण्याची घोषणा केली होती. जवळपास 9 लाख विद्यार्थ्यांनी पहिला पर्याय तर 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय निवडला होता. आता त्यांना एक गुणाचे नुकसान सहन करावे लागणार आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षा होणार नसल्याचा निकाल दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पर्याय उरला नाही. जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात बदल होणार आहे.